जी-7 राष्ट्रांनी ड्रगनवर उगारले ‘दबावअस्त्र’;कोरोना आला कोठून? चीनने खरे काय ते सांगावे!

कोरोनाच्या उत्पत्तीमागील चीनचे कुकर्म ठोस पुराव्यांनिशी चव्हाटय़ावर आणण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि जी-7 राष्ट्रे एकवटली आहेत. कोरोना आला कोठून? याचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या चौकशीत चीनने खरे काय ते सांगावे, तपास पथकाला आवश्यक ती सर्व माहिती द्यावी, अशी तंबीवजा सूचना डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी केली आहे.

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या जी-7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत घेब्रेयेसस हे शनिवारी सहभागी झाले होते. त्यानंतरच त्यांनी चीनला तंबी दिल्याचे अमेरिकन मीडिया ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे. कोरोना नेमका कोठून बाहेर पडून जगभरात पसरला, याचा शोध घेतला जात आहे. या चौकशीच्या पुढील टप्प्यात अधिक पारदर्शकता ठेवली जाईल. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी आम्हाला चीनचे सहकार्य पाहिजे. आम्ही ही चौकशी पुढील टप्प्यात नेण्याची तयारी करीत आहोत, असे टेड्रोस यांनी जाहीर केले आहे. त्यांनी मागील चौकशीच्या अहवालावेळी आलेल्या अडचणींकडेही लक्ष वेधले आहे. मागील चौकशी अहवाल जारी केल्यानंतर डाटा (विशेषतः कच्चा डाटा) शेअर करणे मुश्कील झाले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. जी-7 राष्ट्रांच्या ग्रुपचे सदस्य असलेल्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, पॅनडा आणि जपानच्या नेत्यांनी शिखर परिषदेमध्ये कोरोना उत्पत्तीच्या तपासाला गती देण्यावर भर दिला आहे.

 पारदर्शक चौकशीसाठी अमेरिकेला ब्रिटनची साथ

कोरोना उत्पत्तीबाबत पुराव्यांच्या आधारे पारदर्शक आणि वेळीच चौकशी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला ब्रिटनने साथ दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूएचओकडे कोरोना उत्पत्तीचा तपास वेळीच पूर्ण करण्याची मागणी लावून धरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चौकशीचा मुद्दा उचलून धरला होता. चौकशीत चीनलाही सामील केले पाहिजे, असे बायडेन आणि जॉन्सन यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या