जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

943
who

जगभरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. कोरोनावर अद्याप लस किंवा औषध सापडले नसल्याने कोरोनाच्या प्रकोपाची भीती आहे. त्याचप्रमाणे युरोप आणि आशियातील काही देश कोरोनाविरोधातील परिस्थिती अयोग्य पद्धतीने हाताळत असल्याने जगभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे. सर्व देशांनी या जागतिक संकटाकडे गांभीर्याने बघण्याची गरज डब्लूएचओने व्यक्त केली आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्व देशांनी योग्य त्या उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी दिला आहे.

अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर गेब्रेयेसुस यांनी याबाबत चिंता व्यक्त करत परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा इशारा दिला आहे. सध्या जगभरात 1 कोटी 32 लाख लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिका, ब्राझिल आणि हिंदुस्थानला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. अमेरिकेत कोरोना झपाट्याने फैलावत असल्याने त्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. काही देशांनी या संकटावर मात केली आहे. तर काही देश या संकटाशी मुकाबला करत आहे. तर युरोप आणि आशियातील काही देशात अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात येत असल्याने आगामी काळात कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा गेब्रेयेसुस यांनी दिला आहे.

जगभरात कोरोनाचे संक्रमण अशाचप्रकारे सुरू राहिले तर जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागेल. सध्याची परिस्थिती पाहता नजीकच्या काळात जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच सर्वाधिक फटका बसूनही काही देशांना परिस्थितीचे गांभीर्य समजलेले नाही. अमेरिकेत संक्रमितांची आणि मृतांची संख्या वाढत असल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळले तरच कोरोनाचा संभाव्य उद्रेक रोखण्यात यश येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या