कोरोना नियंत्रणासाठी डब्लूएचओने चीनसह चार देशांची थोपटली पाठ

कोरोनाने जगभरात थैमान घातले असून अमेरिका, रशिया आणि युरोपातील अनेक देश कोरोनाचे संक्रमण रोखण्यास किंवा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरले आहेत. तसेच आता युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) चिंता व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी दक्षिण आशियातील काही देशांनी चांगले प्रयत्न केले आहेत. अमेरिका, युरोप आणि रशियाने आशियातील या देशांकडून शिकण्यासारखे आहे, असे डब्लूएचओने म्हटले आहे.

कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर रुग्णाला क्वॉरंटाईन करण्याची गरज असते. यावर लक्ष देश आशियातील देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे, असे डब्लूएचओचे आपत्कालीन रोगांबाबतचे प्रमुख माइक रेयान यांनी सांगितले. मंगळवारी त्यांनी कोरोनाबाबतच्या स्थितीची माहिती दिली. चीन,जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्टेलिया या चार देशांनी कोरोना नियंत्रणात महत्त्वाची कामगिरी केल्याचे सांगत त्यांनी या चार देशांची पाठ थोपटली आहे.

अमेरिका, रशियासह युरोपातील अनेक देशांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. युरोपमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनामुळे 8,500 जणांचा मृत्यू झाला. तर याच काळात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे डब्लूएचओने म्हटले आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपने आशियातील या देशांकडून कोरोना नियंत्रणाबाबत शिकण्यासारखे आहे, असे रियान म्हणाले. या चार देशांनी टेस्टिंग, आयसोलेटिंग आणि क्वॉरंटाईन यावर भर देत कोरोना संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी केल्याचे ते म्हणाले.

या देशातील नागरिकांनी या संकटाच्या काळात सरकारवर विश्वास दाखवला. सरकारने जारी केलेल्या निर्देशांचे आणि लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले. त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य योजना आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली. या देशातील जनतेनेही सरकारला सक्रीय पाठिंबा दिला. या देशांमध्ये लॉकडाऊननंतरही निर्देशांचे पालन करण्यात आले. जनतेत मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे या देशांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याचे रेयान यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे या देशांनाही फटका बसला. त्यातून हे देश सावरले. त्यानंतर सुरक्षा आणि संक्रमणापासून बचाव करत त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही, याची जाणीव त्यांना असून ते सुरक्षेची योग्य ती काळजी घेत आहे. तसेच अत्यावश्यक बाबींसाठीच ते घराबाहेर पडत आहेत. कोरोनाचे संकट लक्षात घेता त्यांनी जीवनशैलीत बदल केले आहेत. त्यामुळेच या देशांना यश आल्याचे ते म्हणाले.

जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी मुकाबला करून जग थकले आहे. मात्र, आपल्याला सतर्क राहवे लागणार आहे. ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात यश मिळवले आहे, त्यांच्याकडून जगाने शिकण्याची गरज आहे. कोरोनाला हद्दपार करेपर्यंत आपल्याला ही लढाई जारी ठेवावी लागणार आहे. एकमेकांकडून शिकत आणि सुधारणा करत एकजुटीने ही लढाई लढणे गरजेचे असल्याचे रेयान म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या