अणू शास्त्रज्ञाच्या हत्येने इराणचे सत्ताधारी हादरले, बदला घेण्याचा निर्धार

इराणचे अणूशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येने इराणचे सत्ताधारी अयातोल्ला अल खोमेनी जबरदस्त हादरले असून त्यांचे सैन्य सल्लागार होसेन देहगान यांनी या हत्येचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली आहे. दोषींवर आम्ही तुटून पडू अशा आशयाचे विधान त्यांनी केलं आहे. यावरून फखरीजादेह यांचे महत्व किती होतं हे अधोरेखित होतं.

‘अमाद’चा गुप्त नेता

फखरीजादेह यांच्यावर इराणची राजधानी तेहरान जवळ असलेल्या अबसार्ड शहरात शुक्रवारी हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केल्याचं सांगण्यात आलं आहे. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. फखरीजादेह यांची हत्या ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचं संयुक्त राष्ट्राचे राजदूत माजिद तख्त रवांची यांनी म्हटलं आहे. फखरीजादेह यांच्या हत्येमागे हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अंटोनिओ गुटेरेस यांनी या प्रकरणी सगळ्यांनी शांततेने आणि संयमाने वागावे असं आवाहन केलं आहे.

इराणने अणुबॉम्ब तयार करण्यासाठी ‘अमाद’ नावाच्या मोहिमेस सुरुवात केली होती. फखरीजादेह हे या मोहिमेचे प्रमुख होते. इराणला अण्वस्त्र सज्ज करण्यात त्यांचा मोठा हात होता असं बोललं जातं. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादच्या हाती 2003 साली इराणने बंद केलेल्या अण्वस्त्र कार्यक्रमाची गुप्त माहिती लागली होती. इराण हा अण्वस्त्र सज्जतेसाठी नव्याने प्रयत्न करत असल्याचे आरोप केले जात होते. मात्र इराणने हे आरोप खोटे असल्याचं सांगत उर्जेसाठी अथवा शस्त्रासांठी अण्वस्त्र कार्यक्रम हाती घेतला नसल्याचे म्हटले होते.

या अणूशास्त्रज्ञाच्या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा इराणच्या काही अधिकाऱ्यांना संशय आहे. अमेरिका आणि इस्रायल यांची सातत्याने फखरीजादेह यांच्यावर बारीक नजर होती. इराणच्या गुप्त अण्वस्त्र कार्यक्रमामागे फखरीजादेह यांचाच हात असल्याचा त्यांना संशय होता. 2010 ते 2012 या कालावधीमध्ये इराणच्या 4 अणू शास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली होती. या सगळ्या हत्यांना इस्रायलच जबाबदार असल्याचा इराणने सातत्याने आरोप केला होता.

स्फोटाचे आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले!

मोहसिक फखरीजादेह शुक्रवारी त्यांच्या गाडीने जात असताना अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी फखरीजादेह यांच्या सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी स्फोटाचे आणि नंतर मशिनगनने गोळीबार केल्याचे आवाज ऐकल्याचं म्हटलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे की फखरीजादेह यांच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात 3-4 दहशतवादी ठार मारण्यात आले आहेत. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद शरीफ यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचे संकेत मिळत असल्याचं म्हटलं आहे. चुकीचं काम करणाऱ्यांना शिक्षा हा अल्लाहचा कायदा असल्याचं त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोण होते मोहसिन फखरीजादेह?

इराणच्या प्रमुख अणू शास्त्रज्ञांमध्ये फखरीजादेह यांचा पहिला क्रमांक होता. ते इराणी सैन्याच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) वरिष्ठ अधिकारी होते. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमात त्यांची मोठी भूमिका होती. त्यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात केली होती असं इस्रायलच्या हाती लागलेल्या गुप्त कागदपत्रांमध्ये दिसून आल्याचा त्यांनी दावा केला आहे.

2018 साली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी फखरीजादेह यांचा फोटो दाखवत त्यांचं नाव घेतलं होतं. ‘हे नाव ध्यानात ठेवा’ असंही ते म्हणाले होते. 2015 साली न्यूयॉर्क टाईम्सने फखरीजादेह यांची तुलना रॉबर्ट ओपनहायमर या शास्त्रज्ञाशी केली होती. ओपनहायमर यांनीच दुसऱ्या विश्वयुद्धात अणूबॉम्ब बनविला होता.

आपली प्रतिक्रिया द्या