यांचे रक्षण कोण करणार?

126

श्रीकांत उंडाळकर, [email protected]

गेल्या ५ महिन्यांत आपल्या देशातील ६० वाघ दगावले आहेत. मुंबईच्या येऊरच्या जंगलातील प्राण्यांची संख्या घटली आहे. याला जबाबदार कोण आहे?

सध्या सर्व निसर्ग सोबतींचे अस्तित्व धोक्यात आलेले दिसून येते आणि याला कारणीभूत ‘मनुष्य प्राणी’ आहे हे सांगायची गरज नाही. मानवाने आपल्या गरजांची व्याख्या वाढवून भौतिक सुखांना महत्त्व दिले आहे. यामध्ये प्राण्यांच्या अधिवासात घुसून त्यांचे अस्तित्वच धोक्यात घातलेले आहे. यात अनेक वर्षांपूर्वीची वृक्ष, गवतांची कुरणं, नदी आणि समुद्रकिनारीची वाळू अशा सर्वांचाच ऱहास चालू ठेवला आहे. असे अजून चालू राहिले तर यापुढील पिढीला प्राणी, पक्षी, कीटक असे सर्व फक्त फोटोत दाखवण्यापुरते मर्यादित राहील, यात शंका नाही.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अहवालावरून असे दिसून येते की, गेल्या फक्त५5 महिन्यांत संपूर्ण हिंदुस्थानातील एकूण ६० वाघ मृत पावले आहेत. यावरून असे दिसून येते की, हिंदुस्थानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. यामध्ये त्यांच्या नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी असून त्यात त्यांची तस्करी करणे, विष घालून वा जाळून मारणे अशा प्रकारच्या गोष्टी जास्त आहेत. याचे चांगले उदाहरण म्हणजे ‘जय’ नावाचा आकाराने बराच मोठा असणारा वाघ हा नागपूरजवळील उमरेड-काऱहांडला या जंगलातून अचानक गायब झाला. त्याचा माग आजपर्यंत कुणालाही लागला नाही. तसेच काहीच महिन्यांपूर्वी चंद्रपूर जवळच ‘श्रीनिवास’ नावाचा राजबिंडा वाघ इलेक्ट्रिक फेन्सिंगचा शॉक लागून जळून मेला (की मारला?) तर अजून एक वाघ विषप्रयोगाने मेल्याचे स्पष्ट झाले.

हिंदुस्थानची शान असलेल्या आणि काझीरंगा येथे आढळणाऱया ‘एकशिंगी’ गेंडय़ाचे अस्तित्वदेखील धोक्यात आहे. त्याच्या शिंगामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते, असा समज पूर्वेकडील राज्य आणि काही देशांमध्ये आहे म्हणून गेंडय़ाच्या शिंगांची तस्करी आजदेखील राजरोसपणे चालू आहे. त्याचप्रमाणे हरणांची त्यांच्या शिंग आणि मांसासाठी, हत्तीची त्यांच्या सुळ्यांसाठी, वाघ आणि बिबळे यांची त्यांच्या कातडी, दात, नखं आणि हाडं यासाठी दररोज कत्तल होत आहे.

अजूनही खूप उशीर झालेला नाहीए. आपण सर्वजण मिळून यासाठी काही गोष्टी करून हातभार लावू शकतो. यामध्ये अनेक ठिकाणी झाडं लावणे व ते जतन करणे. जंगलात फिरताना तिकडचे सर्व नियम पाळणे.  लोकांना जंगलाचे महत्त्व पटवून सांगणे. प्राणी, पक्षी, वनस्पती यांचा अभ्यास करून त्यांच्या अस्तित्वासाठी कामं करणे, जेणेकरून आपलेही अस्तित्व टिकून राहील. चला तर मग आजपासूनच या कामाला लागूयात.

सजिवांची संख्या कमी झाली

मागील काहीच महिन्यांमध्ये कान्हा, ताडोबा, नागझिरा, जिम कॉर्बेट, काझीरांगा, बंदीपूर, गीर अशा सर्वच जंगलांमधील प्राणी, पक्षी, फुलपाखरे अशासारख्या सजीवांची संख्या कमी झालेली दिसून आली. फक्त संख्याच नाही तर, याआधी त्या त्या ठिकाणी सहज सापडणाऱया काही प्राणी- पक्ष्यांच्या जातींचे आता अस्तित्वच उरले नाही. पर्यटक जंगलात आरडाओरडा करणे, कचरा टाकणे, प्राण्याच्या जवळ गाडी घेऊन जाणे अशा बऱयाच गोष्टी करीत असतात. यासाठी त्या त्या गाडीचे ड्रायव्हर आणि गाईड यांनी त्यांना समज द्यायला हवी. किंबहुना ते देतात पण. मात्र पर्यटक त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या