हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियाच जेतेपदाचे प्रबळ दावेदार

49

सामना ऑनलाईन । लंडन

क्रिकेट मैदानाबाहेरील समस्या आणि वादानंतरही हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघच यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. उद्या गुरुवारी यजमान इंग्लंड व बांगलादेश यांच्यातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. यजमान इंग्लंडनेही वन डे क्रिकेटमध्ये उत्तम प्रगती साधल्याने यजमान संघ स्पर्धेतील ‘छुपा रुस्तम’ ठरू शकतो. ऑस्ट्रेलिया व टीम इंडियाला इंग्लंडपासून सावध राहावे लागणार आहे. स्पर्धा उद्यापासून सुरू होत असली जगभरातील क्रिकेटशौकिनांचे सर्वाधिक लक्ष लागलेय ते 4 जूनच्या हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट युद्धाकडे.

फलंदाजीला अनुकूल ठरतील अशा इंग्लंडच्या खेळपट्टय़ावर हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया हे दोन संघ क्रिकेटशौकिनांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. हिंदुस्थानी संघावर कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदाचे सावट आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी न्याय्य पगारवाढीसाठी लढा देतोय. अशा स्थितीत उभय संघांनी मतभेद व समस्या बाजूला ठेवून सराव लढतींत शानदार कामगिरी केलीय. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी विवादाचे सावट अद्याप तरी आपल्या कामगिरीवर पडू दिलेले नाही. त्यामुळे हे दोन संघच या स्पर्धेच्या विजेतेपदासाठीचे प्रबळ दावेदार असल्याचे भाकीत क्रिकेटचे जाणकार करीत आहेत.

अनुभवाच्या बाबतीत हिंदुस्थानचे पारडे जड

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मोठा अनुभव असलेले कर्णधार विराट कोहली, शिखर धवन,  रोहित शर्मा, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी असे पाच ‘स्टार’ खेळाडू यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या हिंदुस्थानी संघात आहेत. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत टीम इंडियाचे पारडे जड वाटत आहे. शिवाय अष्टपैलू हार्दिक पांडय़ा, बांगलादेशविरुद्ध धडाकेबाज नाबाद 94 धावांची खेळी करणारा दिनेश कार्तिक आणि जिगरबाज केदार जाधव संघाला संकटातून संघाला तारण्याची क्षमता बाळगून आहेत. त्यातच प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह या प्रभावी वेगवान चौकडीमुळे टीम इंडियाची ताकद अधिकच वाढली आहे. त्यात स्टार फिरकीवीर रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा हे प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरू शकणारे आहेत.

अनुभवी व युवा खेळाडूंचा ‘कांगारू’ संघ

‘बलाढय़’ ऑस्ट्रेलियन संघाची मदार डेव्हिड वॉर्नर, कर्णधार स्टिव स्मिथ, ऍरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या ‘स्टार’ फलंदाजांवर आहे. तर मिचेल स्टार्क, जेम्स पॅट्टीसन, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड असा जगातला सर्वोत्तम वेगवान मारा ‘कांगारूं’कडे आहे. शिवाय अष्टपैलू मार्क्स स्टॉईनिसच्या समावेशाने ऑस्ट्रेलियन संघ अधिकच बलवान झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या