IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण होणार विजेता?

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाचा विजेता कोण होणार याचे उत्तर आज मिळणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल. क्रीडाप्रेमी हा सामना पाहण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या लढतीवर पावसाचे सावट आहे.

अहमदाबाद येथे दोन दिवसांपूर्वी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू झाला होता. सायंकाळी सात ऐवजी साडे सात वाजता नाणेफेक झाला आणि सामना रात्री आठ वाजता सुरू झाला. अर्थात सामना उशिरा सुरू झाला असला तरी एकही षटक कमी करण्यात आले नव्हते. आता अंतिम लढतीदरम्यानही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Accuweather ने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबादमध्ये रविवारी सायंकाळी पावसाची शक्यता आहे. जवळपास 40 टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच सूर्यास्तानंतर पावसासह 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पावसात वाहून जातो की काय असा प्रश्न आहे. तसेच झाल्यास मोठा पेच निर्माण होईल. कारण गेल्या हंगामात बीसीसीआयने आयपीएलच्या अंतिम लढतीसाठी एक दिवस राखीव ठेवला होता. परंतु यंदा जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये राखीव दिवसाचा उल्लेख नाही.

IPL 2023 Final GT vs CSK ‘हे’ पाच खेळाडू चालले तर चेन्नई सुपर किंग्सचे विजेतेपद पक्के!

कसा लागेल निकाल?

– एखाद्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्ण षटके खेळली, तर दुसऱ्या संघाला डकवर्थ ल्युईसच्या नियमानुसार निकाल लागण्यासाठी किमान पाच षटके खेळावी लागतील. त्यानंतर डकवर्थ ल्युईसच्या नियमानुसार निकाल लागेल.

– पावसामुळे पाच षटके खेळवण्याची संधी मिळाली नाही तर दोन्ही संघात एक सुपर ओव्हर खेळवण्यात येईल आणि त्याद्वारे विजेता ठरवला जाईल.

– पाच षटकांचा सामना किंवा सुपर ओव्हरही झाली नाही आणि सामनाच रद्द झाला तर मात्र लीग स्टेजला गुणतालिकेमध्ये अव्वल असणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल. गुणतालिकेमध्ये गुजरात 20 गुणांसह पहिल्या, चेन्नई 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. त्यामुळे गुजरातला करंडक उंचावण्याची संधी मिळेल.