तीन पायांची शर्यत कोण जिंकणार?

58

>>निलेश कुलकर्णी<<

nileshkumarkulkarni@gmail.com

दिल्ली महापालिकांच्या २७० वॉर्डांसाठीचे मतदान रविवारी पार पडले. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तिघांनीही ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची केली की त्यामुळे ती नॅशनल न्यूजबनली. खरे तर दिल्ली देशाची राजधानी असली तरी येथे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तीन महापालिका (एमसीडी) असा तिहेरी कारभार चालतो. त्यात केंद्रात भाजप, राज्यात आपआणि महापालिकांमध्ये  राजकीय खिचडी अशी तीन पायांची शर्यत गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत सुरू आहे. पुन्हा केजरीवालांबाबत सामान्य दिल्लीकरांचा तसा भ्रमनिरासच झाला आहे. त्यामुळेच दिल्लीतील ही तीन पायांची शर्यत कोण जिंकते याला राष्ट्रीय महत्त्वप्राप्त झाले आहे.

दिल्ली महापालिकांची (एमसीडी) रविवारी झालेली निवडणूक राष्ट्रीय राजकारणात कमालीचे महत्त्व आले आहे. रविवारी येथील २७० वॉर्डांसाठी मतदान झाले. मतदारांचा फारसा उत्साह न दिसल्याने  प्रत्यक्ष निकाल काय लागतो हे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातही हे निकाल दिल्लीचे मुख्यमंत्री ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा ‘निकाल’ लावणारे ठरणार आहेत. ‘आप’ला गाशा गुंडाळायलाच लावायचा या तयारीनेच भाजप या निवडणुकीत उतरला होता आणि काँग्रेसलाही या साठमारीत यशाचा ऑक्सिजन मिळाला, आप आणि केजरीवाल नेस्तनाबूत झाले तर हवेच आहे. ‘लोकपाल’च्या एका आंदोलनामुळे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल कायम पंतप्रधान मोदी व भाजपला मांजरीसारखे आडवे जात असतात. त्यामुळे ‘राष्ट्रीय नेते’ अशी इमेज त्यांच्या पदरात स्वस्तात पडली, मात्र लोकपालसह अनेक आश्वासनांना केजरीवालांनी यमुनेत स्वाहा केल्याने दिल्लीकर त्यांच्यावर नाराज झाले. त्यातच राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे कोणतेही केडर व कर्तृत्व नसताना पंजाब, गोव्यात त्यांनी राजकीय उड्या मारल्या. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अवस्था एक ना धड भाराभर अशी झाली. देशात विरोधी पक्षाचा मोठा दुष्काळ आहे. मात्र केजरीवाल आपल्याला त्रासदायक ठरू शकतील याची जाणीव झाल्यानंतर दिल्लीच्या इशाऱ्याने केजरीवालांना डिवचणे सुरू झाले. केंद्राचा पोलिसी दंडुका आपच्या पेकाटात दररोजच बसत असल्याने अगोदरच मर्कट त्यात मद्य प्यायला अशी केजरीवालांची अवस्था झाली. वास्तविक ज्या पोलिसी गुह्यांत आपवाल्यांना लटकवले तोच निकष भाजपच्या लोकप्रतिनिधींना लावला तर ८० टक्के भाजपवासी तुरुंगात जाऊ शकतील. मात्र पोलिसी दंडुक्याने आपची इमेज खराब झाल्यानंतर केजरीवालांना हा चक्रव्यूह भेदता आला नाही. वास्तविक आप सरकारने दिल्लीत शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रात तुलनेने चांगले काम केले, मात्र त्याचे श्रेय मिळण्याऐवजी बदनामीचे माप आपच्या नशिबी पडले. त्यात आता राजौरी गार्डनच्या पोटनिवडणुकीतील दारुण पराभवामुळे आपचा आत्मविश्वास डळमळला आहे. त्यामुळेच नाइलाजाने दिल्लीकर पुन्हा भाजपकडे वळतील अशी चिन्हे आहेत. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक मोदी-शहा जोडीने राष्ट्रीय महत्त्वाची केली होती. त्यातून केजरीवाल हे ‘रॉकस्टार’ म्हणून उदयास आले होते. मात्र आता ते ‘फ्लॉपस्टार’ ठरले आहेत. त्यामुळेच सैरभैर झालेल्या केजरीवालांनी  ‘दिल्लीवासियों, भाजपला मत दिले तर तुमचाही कचरा होईल. डास तुम्हाला डसत राहतील आणि तुम्हाला चिकुनगुनिया, डेंग्यू होईल’, असा इशारा दिला आहे. निकालानंतर दिसेलच कोणाला ‘राजकीय चिकुनगुनिया’ होतो ते!

मनोज सिन्हांचे काय होणार?

manoj-sinha

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होता होता राहिलेल्या मनोज सिन्हा यांचे पुढे काय होणार, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. वास्तविक भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे संकेत मिळाल्यानंतर सिन्हांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन वगैरेही उरकले होते. चॅनेलवाल्यांनी ‘सीएम डेसिग्नेट’ म्हणून त्यांच्या बालपणीच्या स्टोऱ्याही दाखविल्या, मात्र अचानक नागपुरातून दांडपट्टा फिरला आणि सिन्हांसाठी तयार झालेली भरजरी ‘राजवस्त्र’ ऐनवेळी योगींना चढविण्यात आली. त्यानंतर संपूर्ण संसदेचे अधिवेशन ‘बेचारे सिन्हाजी’ असे सांत्वन स्वीकारण्यातच सिन्हांचा बहुतांश वेळ गेला. मात्र अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी उत्तर प्रदेशातील खासदारांना रात्रीभोजसाठी निमंत्रित केले. सिन्हा तसे बीएचयूपासूनचे लढाऊ विद्यार्थी नेते. रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे खासदारांची कामासाठी रीघ असते. एक सकारात्मक मंत्री म्हणून त्यांनी इमेज बनवली. त्यामुळेच मुख्यमंत्री न झाल्याचे शल्य त्यांनी कधी बोलून दाखवले नाही. सिन्हांची मेजवानी ऐन भरात आलेली असताना एका खासदाराने ‘बेचारे..’ असा सूर आळवताच वैतागलेल्या सिन्हा यांनी ‘सीएमपेक्षाही मला मोठी जबाबदारी मिळणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला. मात्र संबंधित खासदाराने ही सिन्हावाणी मीडियाला उत्साहाच्या भरात सांगून टाकली. पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर सिन्हा संरक्षणमंत्री बनणार अशा बातम्या मग ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून झळकल्या. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सिन्हा यांनी संबंधित खासदाराला फैलावर घेतले. टीव्हीवर झळकलेल्या बातम्या भाजपमध्ये कधीच खऱ्या ठरत नाहीत. माझा दुसऱ्यांदा ‘मामा’ करू नका, मला सुखाने जगू द्या अशा शब्दांत सिन्हांनी कानउघाडणी केली.

काँग्रेसमध्ये ज्येष्ठांचे अच्छे दिन

congress-logo

भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या वरिष्ठ नेत्यांना अडगळीत टाकण्यासाठी ‘मार्गदर्शक मंडळ’ तयार करण्यात आलेले असताना काँग्रेसमध्ये मात्र तरुण तुर्कांना बाजूला सारून ज्येष्ठांना मानाचे पान वाढण्यात येत असल्याने काँग्रेसमध्ये आता बुजुर्गांना अच्छे दिन येतील असे मानले जात आहे. राहुल गांधी पक्षात सक्रिय झाल्यापासून त्यांनी जाणीवपूर्वक जनरेशन नेक्स्टला प्रोजेक्ट करून प्रस्थापित नेत्यांना अडगळीत टाकले होते, मात्र ही जनरेशन नेक्स्ट अगदीच कुचकामी ठरल्याचे दिसून येते. अशोक तंवर, सचिन पायलट, अरुण यादव या टीम राहुलमधील सदस्यांना अनुक्रमे हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत प्रदेशाध्यक्ष बनविल्यानंतरही त्यांचा प्रभाव पाडता आला नाही. उलट काँग्रेसची अवस्था अधिकच गलितगात्र झाली. त्यातच हेमंत बिस्वा सरमा, विश्वजित राणे, अरविंद लव्हली या कधीकाळी टीम राहुलमध्ये असलेल्या नेत्यांनीच राहुल यांच्यावर कडवट टीका करत पक्षाला बाय बाय केला. त्यामुळे आता बुजुर्गांशिवाय पर्याय नाही या मतापर्यंत राहुलबाबा आले. त्यांनी नुकतीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. त्यात अगदी किशोरचंद्र देव यांच्यासारखे अगदीच मोडीत निघालेले नेतेही सहभागी झाले होते. काँग्रेसचा ‘हात’ मजबूत करण्यासाठी बुजुर्गांच्या खांद्याला खांदा लावावा लागत आहे. काँग्रेसमधील ही परिस्थिती ओळखून हरयाणाच्या भूपिंदरिसंग हुड्डा, केरळात ओमन चांडी, कर्नाटकात वीरप्पा मोईली तर राजस्थानात अशोक गेहलोत यांनी ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ असे काँग्रेसमधील जनरेशन नेक्स्टला सुनावत प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला आहे. जगातील सर्वाधिक तरुणाई असलेल्या आपल्या देशात काँग्रेससारख्या सर्वात बुजुर्ग पक्षात ज्येष्ठ नागरिक मंडळाला येत असलेले ‘अच्छे दिन’ हे त्यामुळेच मनोरंजनाची मेजवानी देणारे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या