भाजपवाले सत्याला एवढे का घाबरताहेत? प्रियंका गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

1247

देशातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी_वढेरा यांनी सोमवारी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी सरकारने गंभीर वास्तव झाकण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालामध्ये फेरफार केला. भाजप सरकारमधील लोक सत्याला इतके का घाबरताहेत, असा सवाल प्रियंका यांनी या वेळी केला.

एनसीआरबीच्या अहवालात पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येची राज्यनिहाय आकडेवारी देण्यात आली नाही. हा सरकारने अहवालात फेरफार केल्याचा परिणाम असल्याचा घणाघात प्रियंका यांनी ट्विटद्वारे केला. भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकरी लागोपाठ आत्महत्या करताहेत, परंतु सरकार हा प्रश्न सोडवण्याऐवजी शेतकरी आत्महत्येच्या अहवालात फेरफार व त्यातील सत्य झाकण्यात समाधान मानत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांना कष्टाचे फळ नाही

सरकारने शेतकऱ्यांची किती दुर्दशा करून ठेवली आहे! कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी कांदा आयात केला जातोय, परंतु आमच्या शेतकऱ्यांना मेहनतीतून पिकवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत नाही. हे सगळे का घडतेय, असा जाब प्रियंका यांनी सरकारला विचारला आहे.

कर्मचाऱ्यांच्या पीएफचा हिशेब द्यावाच लागेल!

प्रियंका यांनी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारवरही जोरदार टीका केली. तेथील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा डीएचएफएलवर अजिबात विश्वास नसल्याचे म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफचा हिशेब सरकारने दिलाच पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यापासून का कचरतेय, असा सवाल प्रियंका यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या