‘सनबर्न’च्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष का?

44

पुणे– गावकर्‍यांचा विरोध आणि केसनंदमध्ये दारूबंदीचा ठराव असूनही सनबर्नमध्ये मद्य परवाना कसा दिला. अनेक परवानग्या नसताना आणि ध्वनिनियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या अनधिकृत सनबर्न महोत्सवातील गैरप्रकारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल आज हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना केला.

हिंदुत्ववादी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सनबर्न महोत्सव रद्द करण्याची मागणी केली. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, उपजिल्हाप्रमुख संदीप भोंडवे, युवासेनेचे विपुल शितोळे, हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे, सनातन संस्थेचे अभय वर्तक, लाल महाल उत्सव समितीचे चंद्रशेखर शिंदे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वाघमारे, सावरकर प्रतिष्ठानचे रामदास हरगुडे, ह.भ.प. श्याम महाराज राठोड, विद्याधर नारगोलकर, मोनिका गावडे, सरिता अंबिके आदी यावेळी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव संमत केलेला असल्याने सनबर्न उत्सवाच्या ठिकाणी मद्यसेवन आणि मद्य बाळगणे या दोन्हींवर प्रतिबंध लादावा, ध्वनिप्रदूषण कायद्याचे भंग करणारी ‘डिजे’ यंत्रणा बंद करण्यात यावी, कार्यक्रमाला येणार्‍या विदेशी नागरिकांमध्ये कोणी गुन्हेगार, अंमली पदार्थांचा व्यापारी आहे का नाही याची तपासणी करावी, विदेशी संगीतकार हे ‘बिझनेस व्हिसा’ घेऊन येत असल्याचे तपासून घ्यावे, सनबर्न कार्यक्रमाच्या संगीतरजनीनंतर रात्री साडेदहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत होणार्‍या ‘सनबर्न आफ्टर डार्क’ या कार्यक्रमांतर्गत अंमली पदार्थ किंवा वेश्याव्यवसायला प्रोत्साहन मिळणार नाही याची दक्षता घ्यावी, अपघात रोखण्याच्या दृष्टीने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ मोहिमेच्या अंतर्गत सनबर्नच्या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून बाहेर पडणार्‍यांची तपासणी करावी, सनबर्नच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होते आहे का, याची शासनाने तपासणी करावी, आदी मागण्या हिंदुत्ववादी संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या