कुंबळेला मुदतवाढ का नाही? लोढा समितीचा बीसीसीआयला सवाल

22

सामना ऑनलाईन । मुंबई

अनिल कुंबळेसारखा देशी प्रशिक्षक गेले वर्षभर टीम इंडियाला मोठे यश मिळवून देतोय. त्याला मुदतवाढ देण्याऐवजी नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्याने तुम्ही काय मोठा तीर मारणार आहात, असा सवाल करीत न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने बीसीसीआयला चांगलेच फटकारले आहे. कुंबळेला कमी लेखण्याची कृती आणि त्याने प्रशासक समितीसमोर क्रिकेटपटूंची व्यथा मांडली म्हणून त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय प्रशासक समितीला मुळीच पसंत पडलेला नाही, असेही लोढा समितीचे सचिव गोपाळ शंकरनारायणन यांनी बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश न पाळता संघातील सामान्य क्रिकेटपटूंना व प्रशिक्षकांना वेगळा न्याय आणि पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे प्रकार आता चालणार नाहीत असे सांगून शंकरनारायण म्हणाले, लोढा समितीच्या शिफारशींना विरोध करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या बीसीसीआय पदाधिकाऱयांनी आता तरी शुद्धीत यावे. मुख्य प्रशिक्षकाचा एक वर्षाचा करार हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. यापुढे असले गमतीदार करार करू नका. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या तोंडावर एक वर्षाच्या कराराचा तुकडा फेकला हा त्या पदाचा मोठा अपमानच आहे, असेही शंकरनारायणन यांनी बजावले.

न्यायमूर्ती लोढा समितीचे सचिव गोपाळ शंकरनारायणन यांच्या वक्तव्याला आम्ही तितकेसे महत्त्व देत नाही असे सांगून बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने क्रिकेट बोर्डाच्या कारभारात लोढा समितीचा हस्तक्षेप कशाला, असा सवाल केला. आम्ही नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया सुरू केली नाही तर उद्या हेच लोक आमच्यावर दोषारोप करतील, असेही तो पदाधिकारी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या