पेपर का फुटले?

सीमेवर जवान रोज शहीद होतात व खाली सैन्यभरतीचे पेपर विकले जातात, असा हा एकंदरीत गचाळ कारभार चालला आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे व संरक्षण खात्याचा कारभार ते पणजीतूनच चालवत आहेत. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात तोपर्यंत तरी नीट काम करा. राष्ट्राच्या सुरक्षेशी हे सर्व जोडलेले आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. त्यामुळे सैन्यभरती पेपर घोटाळ्याची जबाबदारी सरकारनेच घ्यायला हवी.

 पेपर का फुटले?

देशाच्या सैन्यभरतीची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करावी लागली आहे. विद्यापीठांचे व इतर परीक्षांचे पेपर आतापर्यंत फुटत होते, पण संरक्षण दलाशी संबंधित महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने सरकारचे धिंडवडे निघाले आहेत. ही भरती सीमेवरील जवान किंवा अधिकाऱ्यांची नव्हती हे मान्य. संरक्षण खात्यातील टेक्निशियन, लिपिक, ट्रेडस्मन व इतर अशाच काही पदांसाठी ही लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षा देशभरात होणार होत्या, पण सैन्यभरती परीक्षेची प्रश्नपत्रिका आर्मी रिक्रुटमेंट डिपार्टमेंटमधून फोडण्यात आली व तेथून ही प्रश्नपत्रिका काही खासगी क्लासपर्यंत पोहोचली. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याकडून प्रत्येकी ३ -४ लाख रुपये घेऊन त्यांना या प्रश्नपत्रिका विकण्यात आल्याचे आता उघड झाल्याने वाळवी कुठपर्यंत पोहोचली त्याचा पर्दाफाश झाला आहे. सैन्यभरतीची परीक्षा केंद्रे देशभरात होती, पण पेपर फुटले महाराष्ट्रात. पेपरफुटीचे मुख्य केंद्र सापडले ते नागपुरात. पुण्यातही त्याचे धागेदोरे पोहोचले, पण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गोवा राज्यातही ‘पेपर’ फुटले. गुजरातच्या अहमदाबादेपर्यंत हे ‘रॅकेट’ असल्याचे उघड झाले आहे. या सगळ्या प्रकरणात सरकारची अब्रू धुळीस मिळाली आहे. पेपरफुटीनंतर देशभरातील परीक्षा रद्द केल्या हे सर्व वरवरचे उपचार आहेत. ठाणे पोलिसांनी ही कारवाई करून पेपरफुटीचे रॅकेट उघडे केले नसते तर संरक्षण खात्यास लागलेल्या वाळवीचा सुगावा लागला नसता. सीमेवर जवान रोज शहीद होतात व खाली सैन्यभरतीचे पेपर विकले जातात, असा हा एकंदरीत गचाळ कारभार चालला आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे व संरक्षण खात्याचा कारभार ते पणजीतूनच चालवत आहेत. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात तोपर्यंत तरी नीट काम करा. राष्ट्राच्या सुरक्षेशी हे सर्व जोडलेले आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. त्यामुळे सैन्यभरती पेपर घोटाळ्याची जबाबदारी सरकारनेच घ्यायला हवी. हा विषय कायदा – सुव्यवस्थेइतकाच राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. महाराष्ट्रातले जवान सीमेवर सर्वाधिक हौतात्म्य पत्करीत आहेत. त्याच महाराष्ट्रात ‘सैन्यभरती’ घोटाळा व्हावा याची खंत सरकारला नसली तरी आम्हाला आहे. सैन्यभरतीचे पेपर फुटले व विद्यार्थ्यांनी ते विकत घेतले. पंतप्रधान व त्यांचा पक्ष सध्या देशभक्ती व त्यागाचे रोज शब्दशिंपण करीत आहे. मात्र ते जमिनीत झिरपलेले दिसत नाही. नोटाबंदीत देशभक्ती असेल तर मग ती सैन्यभरतीतही असायला हवी. सैन्यभरतीचा पेपर फोडणाऱ्यांनी व ते विकत घेणाऱ्यांनी देशभक्तीचा लिलाव केला असेल तर तो नक्की कोणाचा पराभव? देशात मोदी व राज्यात फडणवीस यांच्या विचारांची प्रेरणा आहे व त्यांच्याच प्रेरणेतून जय-विजय होत असतात. त्यामुळे त्याग व देशभक्तीत पारदर्शकतेचा काय घोटाळा झाला त्याचा शोध घ्यावाच लागेल!