आजच्या पिढीला एवढा राग का येतो ?

179

>> डॉ. अजित नेरुरकर, मानसोपचारतज्ञ

आजच्या पिढीला एवढा राग का येतो ? आईने मुलांना रागावणं ही प्रत्येक घरात घडणारी आम बाब; पण यातून हिंसक पाऊल उचलणे… आजच्या पिढीची मानसिकता काय आहे?
सिद्धांत गणोरे अभियांत्रिकी शाखेचा 21 वर्षीय विद्यार्थी. ‘मी माझ्या आईला कंटाळलोय’ या भावनेतून त्याने थेट आपल्या आईचीच हत्या केली. खरे पाहता आई आणि मुलगा हे एक सुंदर नातं…एकमेकांना न सांगता सहज समजून घेणारं…जगातलं सगळ्यात सोपं नातं…या अशा नितांत छान नात्यात हे असंही होऊ शकतं…? का व्हावं हे असं…?

आजकाल बऱ्याच पालकांचे आपल्या मुलाने कोणते करियर निवडावे याविषयीचे निर्णय चुकतात. पालक आपल्या मुलाने कोणत्या विषयात किती मार्क मिळवले आहेत, मुलाची आवड कशात आहे हे न बघता त्याने इंजिनीयरिंग किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा असते. आईवडिलांचं प्रेशर हे मुलांची गुणवत्ता लक्षात न घेता असतं. ही आता नित्याची बाब झाली आहे. मुलाला आर्ट्सला प्रवेश घ्यायचा असेल तर पालकांना ते नको वाटतं. त्याऐवजी त्याची क्षमता नसतानाही कॉमर्सला प्रवेश घेऊन सीए व्हावं, विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर व्हावं, असं वाटत असतं. त्यामुळे गुणवत्ता नसली तरी मुलांना अशा शाखांमध्ये ढकललं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांची क्षमता न ओळखता माझे मित्र त्या शाखेत प्रवेश घेत आहेत म्हणून मीही घेतो असे केले जाते, पण प्रत्यक्ष अभ्यास करताना विषय डोक्यातच शिरत नाही हे त्याच्या लक्षात येतं. म्हणून महाविद्यालयात अनुपस्थितीत राहणं, विषय न आवडणे अशा समस्या निर्माण होतात. अशा वेळी या मुलांचा टाईम पास करण्याकडे कल वाढतो. ही मुलं अभ्यास करत न करणे, दांड्य़ा मारणे किंवा असामाजिक वर्तन करायला धजावतात. असामाजिकपणा हे गुन्हे घडण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. यातून घरांतच दंगा करणं, चोरी करणं, मारामारी करणं, मुलींची छेड काढणं अशा घटना घडतात.

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ही प्रचंड मोठी गोष्ट असते. काही मुलं घाबरट असतात, काही प्रेमळ असतात, तशी काही मुलं रागीट असतात. हे जन्मतःच त्यांच्यामध्ये असलेली स्वभाव गुणधर्म आहेत. हे गुणधर्म जेनेटिक असतात. काही जण स्वभावतः उग्र असतात. या मुलांना राग जास्त येतो. स्वतःच्या विरोधात जी परिस्थिती निर्माण होते ती अशा मुलांना रागाकडे प्रवृत्त करू शकते. अशा वेळी बहुतेक वेळा पालक जसे वागतात तशीच मुले वागू लागतात. उदा. वडील अशा वेळी जर आरडाओरडा करत असतील तर मूलही तेच शिकतं किंवा काही घरांत जर पालक घाबरत असतील तर मूलही घाबरायला शिकते. याकरिता संस्काराची गरज असते. संस्कारातून व्यक्तीला दुःख सहन करण्याची शक्ती मिळते. तेव्हा आपल्या विपरीत जरी परिस्थिती असली तरी आपल्याला परिस्थितीवर मात करण्याचं बळ संस्कारातून मिळतं. नाहीतर सगळ्यातून व्यसनांच्या आहारी जाऊन मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता असते.

पैशापेक्षा संस्कारांना महत्त्व द्या
आई आणि मूल या दोन नात्यांमधला सुसंवाद आता हरवलाय. आई आपल्या मुलाला सगळ्या त्रासातून सांभाळून घेते. याकरिता पालकांनी मुलाला टोमणे मारू नयेत. उदा. तुला हे जमत नाही, तू हे करू शकत नाही वगैरे. मुलावर राग दाखवणारी आई त्याला नको असते. हल्ली आईवडिलांकडे मुलांवर संस्कार करायला वेळच नाही. पालकांचा ओढा वेळेऐवजी मुलांना पैसे देऊन तडजोड करण्याकडे असतो. पैसे वापरायची अक्कल मुलामध्ये नसेल तर पैशाचा दुरुपयोग होतो. म्हणून संस्कार महत्त्वाचे आहेत.

परस्परांमध्ये संवाद कसा वाढवाल?
– पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढवण्याकरिता कौटुंबिक वातावरण एकजुटीचे हवे.
– टीव्हीवरील एखादी मालिका घरात सगळ्यांना आवडत असेल तर ती एकत्र पाहावी.
– घरातील काही कामे आई-वडील, मुलांनी एकत्र येऊन करावीत.
– लग्न, मुंज, घरगुती समारंभावेळी सगळ्यांमध्ये सहभागी व्हावे.
– पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यावा, त्यांच्याबरोबर खेळायला, फिरायला, देवळात जावे.
– घरात आजी-आजोबा असतील तर मुलांना गोष्टी सांगणे.
– चहा बनवणे, सरबत बनवणे, आलेल्या पाहुण्यांना पाणी देणे इत्यादी कामे मुलांनाही करू द्यावीत. त्यामुळे संवाद वाढतो.
– आज मुलांना मिळालेल्या मुक्त वातावरणामुळे हिंसक घटना घडत नाहीत, तर त्या घरात नसलेल्या सुसंवादामुळे घडत असतात.

सुविधा आणि गुणांचा सुयोग्य वापर
सध्या जीवनावश्यक सुखसोयींचं प्रमाण खूपच वाढलंय. आज मोबाईल आहेत. पूर्वी अशी सोय नव्हती. जेव्हा सुबत्ता वाढते तेव्हा माणसांमध्ये उन्माद निर्माण होतो. जेव्हा आपण आपली एखादी गोष्ट दुसऱ्याबरोबर शेअर करत नाही तेव्हा आपल्यामध्ये आपल्यामध्ये मोठेपणा निर्माण होतो. अहंकार निर्माण होतो. सध्याच्या पिढीला चांगले गुण आत्मसात करण्याबरोबरच दुसऱ्याचा विचार करणे, शेअरिंग करणे, समस्येचं मूळ शोधणे हे गुण आत्मसात करायला हवेत. हल्ली सगळेच स्वतःत हरवलले आहेत. याचे कारण आपल्या लायकीच्या पलीकडच्या सुखसोयी सगळ्यांना मिळत आहेत. त्यामुळे नवीन पिढीने मिळालेल्या सुविधांबरोबरच चांगले संस्कार अंगी बाणवायला हवेत.

हिंसक भावना का?
हिंसक भावना ही सहजासहजी निर्माण होत नाही. त्याकरिता आधी आत्महत्येचाही प्रयत्न मुले करतात. यामध्ये जी परिस्थिती आवडत नाही त्यामध्ये पळून जाणे (फ्लाईट रिस्पॉन्स)किंवा फाईट करणं (फाईट रिस्पॉन्स)असे दोन भाग आहेत. आत्महत्या करणे हा फ्लाईट रिस्पॉन्स आहे. मेलो किंवा पळून गेलो तर मी या परिस्थितीमध्ये नाहीए. सगळ्यांपासून नाहीसा झालो तर मला समस्या येणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात पहिली प्रतिक्रिया पळून जाण्याची (फ्लाईट रिस्पॉन्स) असते. आत्महत्या करण्याची प्रतिक्रिया काही मुलांमध्ये कमी असते. म्हणून फाईट करण्याचा मार्ग स्वीकारला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या