‘टीव्हीवर चड्डी घालणाऱ्या बायकांना विरोध का नाही ?’भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

363

सामना ऑनलाईन । भोपाळ

‘टीव्हीवर चड्डी घालणाऱ्या बायकांना कुणी विरोध का करत नाही ?’असे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री गोपाळ भार्गव यांनी केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भार्गव यांची जीभ घसरल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिलीय.

मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या गढकोटामध्ये झालेल्या जत्रेत महिलांनी ‘राई’हा बुंदेली नृत्य प्रकार सादर केला होता. राज्यात एकिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या ‘राई’नृत्याचा अट्टहास कशाला अशी टीका काही जणांकडून होत होती. याबाबत मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना भार्गव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

‘आमच्या आई-बहिणी, संपूर्ण शरीर झाकणारा घागरा घालून नाच करतात तर टीव्हीवर बायका चड्डी घालून फिरत असतात, अशा बायकांना तुम्ही का विरोध करत नाही ?’असा प्रश्न भार्गव यांनी पत्रकारांना विचारला. तुमच्यापैकी ९० टक्के जण हे सारे मोबाइलवर पाहत असता असेही त्यांनी यावेळी सुनावले.

यापूर्वीही घसरलीय मंत्रीजींची जीभ

गोपाळ भार्गव यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी त्यांनी शेतकरी आत्महत्यांची तुलना आमदारांच्या मृत्यूशी केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. १० आमदारांच्या मृत्यूचा दाखला देत त्यांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूवर इतका गजहब कशाला करता ? असा प्रश्न विचारला होता.

‘ब्रेन हॅमरेज किंवा अन्य तणावामुळे लोकांचा मृत्यू होतो. आम्हीही सतत प्रवास करत असतो. आमचे आयुष्यही नेहमी धोक्यात असते असे असूनही शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरच आरडाओरडा केला जातो ’ असे भार्गव यांनी म्हंटले होते. या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर त्यांनी खुलासा करत शेतकऱ्यांबद्दल संवेदना व्यक्त केली होती. मागच्या वर्षी एका महिला आयएएस अधिकाऱ्याला ‘बाई’असे संबोधल्यानेही भार्गव वादात सापडले होते.

आपली प्रतिक्रिया द्या