जी-20 परिषदेला मुंबई विद्यापीठाकडून 50 लाखांची तरतूद कशासाठी? सिनेट सभेत मंजूर अर्थसंकल्पावर युवासेनेकडून ताशेरे

मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सिनेट सभेत नामनियुक्त सदस्यांनी कोणतीही चर्चा न करता अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पावर युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ताशेरे ओढले आहे. नागपूर येथे होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी मुंबई विद्यापीठाने 50 लाखांची तरतूद कशासाठी केली, असा सवाल युवासेनेने केला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करावे, त्यासाठी आदी सर्व प्राधिकरणाच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही युवासेनेच्या वतीने प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे करण्यात आली आहे.

20 मार्च रोजी मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सिनेट सभा पार पडली. एरवी किमान दोन दिवस चालणारी ही सभा यंदा केवळ तीन तासांत आटोपती घेण्यात आली. या सभेत विद्यापीठाकडून मांडण्यात आलेल्या 811 कोटींच्या अर्थसंकल्पावर युवासेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. अर्थसंकल्पातील लाखो रुपयांच्या तरतुदी या व्यर्थ असल्याची टीका युवासेनेकडून करण्यात आली आहे.

जी-20 परिषदेसाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यात विद्यापीठाची भूमिका काय आहे? असा सवाल युवासेनेने केला आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यासन केंद्र तसेच कलादालनासाठी अर्थसंकल्पात काहीही तरतूद केलेली नाही. 50 कोटी रुपयांमध्ये विद्यापीठ किती नव्या इमारती बांधणार आहे आणि 35 कोटींमध्ये विद्यापीठ संगणकीकरण करून विद्यापीठ स्वबळावर सर्व कामे करणार की, एमकेसीएल आणि तत्सम पंपन्यांना पंत्राट देणे सुरूच ठेवणार आहे, असा सवालही युवासेनेने केला आहे. युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी निवदेनाद्वारे अर्थसंकल्पावर चर्चा घडवून आणण्यासाठी निवडणुकांनंतर विशेष सभा घेण्याची मागणी कुलगुरूंकडे केली आहे.