लस घेतल्यानंतरही काही लोकांना कोरोनाची लागण का होतेय? अदर पूनावाला म्हणतात…

देशात कोरोनाची दुसरी लाट भयानक रुप घेत असून गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तसेच मृतांची संख्याही दिवसेंदिवस फुगत चालली आहे. दुसरीकडे लसीकरणालाही वेग आला आहे. मात्र लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील गंगाराम रुग्णालय आणि एम्समधील काही डॉक्टरांना कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लागण झाल्याचे समोर आले आहे.

सुरुवातीला लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणार नाही असा विचार तुम्हीही केला असेल. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास काही काळ लागतो. या दरम्यान लस घेणारा व्यक्ती कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यास त्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच यामागे अन्यही काही कारणं आहेत ती देखील जाणून घेऊया…

नियमांचे पालन न करणे

कोरोनाची लस घेतल्यानंतर लस घेणारा व्यक्ती आता मला काहीही होणार नाही, असा विचार करून बिनदास्त फिरताना दिसतोय. यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याकडेही दुर्लक्ष होताना दिसतेय. सरकारकडून घालून देण्यात आलेल्या त्रिसूत्री (मास्क घाला, हात धुवा आणि सोशल डिस्टन्स पाळा) याकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण होत आहे.

लसीकरणाच्या नियमांचे पालन न करणे

प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस देताना डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी लसीकरणाआधी आणि लसीकरणानंतर पालन करायच्या नियमांची माहिती देतात. मात्र लसीकरणानंतर काही लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले असून हेच लोक कोरोना संक्रिमत होताहेत.

दोन डोस वेळेत न घेणे

लसीकरणानंतर कोरोनाची लागण न होण्यामागे एक कारण दोन डोस वेळेत घेणे हे देखील असल्याचे समोर आले आहे. काही लोक कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. दुसरा डोस वेळेत न मिळाल्यानेही लोक कोरोना संक्रमित होत आहेत, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

डॉक्टरांचे काय आहे म्हणणे?

लसीकरणानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. कोणतीही लस पूर्णपणे एखादा आजार होण्यापासून रोखू शकत नाही, तर लस घेतल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच लसीकरणानंतर कोरोना झाला तर घाबरून जावू नका. लस घेतलेली असल्यामुळे यातून लवकर बरे होण्याचीच शक्यता अधिक असल्याचे डॉक्टर म्हणतात.

अदर पूनावाला म्हणतात…

पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘इंडिया टू़डे‘ला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? याचे उत्तर दिले. कोवीशील्ड लस घेतल्यामुळे तुम्हाला आजार होण्यापासून रोखले जावू शकणार नाही. मात्र ही लस घेतल्यास कोरोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल, असे ते म्हणाले.

कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, तज्ञांचा इशारा

बुलेटप्रूफ जॅकेटप्रमाणे करते काम

कोरोनाची लस एकप्रकारची बुलेट प्रुफ जॅकेट सारखी आहे. गोळी लागल्यानंतर बुलेट प्रुफ जॅकेटमुळे माणूस मरत नाही, मात्र तुम्हाला थोडे फार डॅमेज होते, असेही अदर पूनावाला म्हणाले. तसेच आतापर्यंत 4 कोटी लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. हे लोक रुग्णालयात भरती आहेत का हे पाहावे लागणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच मानवाकडून तयार करण्यात आलेली कोणतीच गोष्ट शंभर टक्के योग्य असूच शकत नाही, असेही पूनावाला म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या