अक्षय्य तृतीया : लाभप्रद मुहूर्त!

53

ravindra-gadgil>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. महाराष्ट्रात ही तिथी, सण म्हणून साजरी करतात. कौटुंबिक पातळीवर धार्मिक श्रद्धेने ह्या दिवशी सत्कार्य करतात. आपल्या पितरांविषयी कृतज्ञता म्हणून अनेक कुटुंबात पितरांना तर्पण विधी करून त्यांचे स्मरण करतात. पितरांनी आपल्यासाठी केलेले अमोल कष्ट, त्यागाचे स्मरण व त्यांच्या सद्गुणांचेही स्मरण करावे आणि आपणही त्यांच्याप्रमाणे वागून आपले जीवन समृद्ध करावे, हा त्यामागील हेतू! या दिवशी केलेला जप, तप, दान, हवन,सेवा,मदत, सहकार्य, पुण्यकर्म अक्षय टिकते असा पूर्वसूरींचा अनुभव व पक्की खात्री आहे. आपण विश्वास ठेऊन अनुभव घ्यावा.

दानाची व त्यागाची आपल्या हाताला सवय लागावी हा आपल्या सण आणि संस्कृतीचा मूळ हेतू आहे. आपल्याला फक्त घेत राहण्याची सवय असते. तसे न होता देण्याचीही हाताला सवय लागावी आणि त्यागाचा आनंद उपभोगता यावा म्हणून हे निमित्त. दानाचा आनंद देणार्‍याला व घेणार्‍याला एकाच वेळी मिळतो हे विशेष. त्यातून आपला अहंकार नष्ट होतो.

आपण जे काही जमा करत असतो त्यातील दशांश तरी दुसर्‍याला द्यावे. अर्थात योग्य स्थळी, योग्य व्यक्तीस, योग्य काळी. अन्यथा ते दान नव्हे नादान ठरते. दान नाही केले तर तेच दुपटीने निघून जाते, दुसर्‍या मार्गाने, तेही आपल्या नकळत! मधमाशीचेच उदाहरण घ्या ना! तिला तिने कष्ट करून जमवलेला मध प्यायला वेळ नसतो, नुसते जमवत जाते, आणि एखाददिवशी सर्वच गमावून बसते. म्हणजेच तुम्ही जमवलेल्या सम्पत्तीवर दुसर्‍याचाही हक्क असतो.

आपल्या धार्मिक संस्कृतीच्या आडून अनेक लोकोपयोगी चांगल्या संकल्पना सांगितल्या आहेत. इंदुरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी तर दान-धर्म हीच सेवा आणि आदर्श मानला. गावोगावी खेड्यापाड्यात विहिरी खणून पाण्याने परिपूर्ण केल्या व पूर्वीच्या वाटसरूंची, सैनिकांची, पंथस्थांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म केले, कुठेही नामाचा फलक न लिहिता हे विशेष! आता ह्या सेवेचे स्वरूप बदलले असेल, पण आजही सिंधी व कच्छी बांधव स्टेशनला व बस स्टँडवर पाण्याच्या बाटल्या, पाऊच, वाटत असतात, तसेच ताकाचेही वाटप करतात. कारण ते जिथून आले आहेत त्या कच्छच्या वाळवंटाचे तहानेचे व उन्हाचे चटके त्यांच्या मनावर पिढ्यांपिढ्या अजून आहेत, म्हणून ही कृतज्ञता.

सूर्यवंशातील भगीरथ राजाने आजच्याच दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली, अशी एक कथा आहे. त्याच्या भगीरथ, अविरत प्रयत्नाला दाद म्हणून, एक कृतज्ञता म्हणूनही त्याचे पुण्यस्मरण आज करतात.

अनेक ठिकाणी वसंतोत्सव साजरा होतो. चैत्र गौरीचे हळदीकुंकू समारंभ सांगताही ह्याच दिवशी होते. कच्च्या वा उकडलेल्या कैरीचे पन्हे, हरभऱ्याची वाटलेली डाळ, खिरापत देऊन ओल्या मोड आलेल्या हरभर्‍यांनी स्त्रिया एकमेकींच्या ओट्या भरतात व एकमेकींच्या संसारांचे सौभाग्य चिंतितात. त्यामुळे अनेक लहानमोठ्या स्त्रियांची गाठभेट होऊन विचारांचे आदानप्रदान होते व सुखादुखांची चौकशी होते. अनेक मुलींची अशातूनच लग्नेही जुळतात तर काहींना ज्येष्ठ स्त्रियांकडून संसारातील अडीअडचणींवर तोडगे, उपाय, सल्ला, मार्गदर्शन मिळते तर काहींना आजीबाईंच्या बटव्यातील जडीबूटींचे हमखास रामबाण औषधही मिळते. सर्व स्तरातील आसपासच्या स्त्रिया मतभेद विसरून एकोपा वाढतो. पूर्वग्रह,गैरसमज दूर होऊन प्रेम वाढते. प्रचंड महितीचा स्त्रोत खुला होतो.

साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असल्याने अनेक गृहप्रवेश, वास्तुशांती, पूजा, उद्घाटने, समारंभ, सम्मेलने ह्या दिवशी धुमधडाक्याने होत असतात. असा हा कल्याणकारी मुहूर्त सर्वांना लाभप्रद, शुभप्रद ठरो ही सदिच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या