उन्नाव बलात्कार पीडित महिलेचे पत्र का पोहचले नाही? सरन्यायाधीश रंजन गोगाईंचा उद्विग्न सवाल

500

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितांचा घातपात होऊ शकतो अशी भीती संबंधित कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात पीडिताने लिहिलेले पत्र  आपल्यापर्यंत का पोहचले नाही असा उद्विग्न सवाल  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश प्रशासनाकडून गुरुवारपर्यंत उन्नाव बलात्कार पीडितेच्या गाडीला झालेल्या अपघाताचा अहवाल मागवला आहे.

उन्नाव प्रकरणातील पीडित परिवाराने 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिले होते. या पत्रात पीडित परिवाराने भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्या धमकीचा उल्लेख केला होता, मात्र ते मला मिळाले नाही. या विषयी रजिस्टारनी अहवाल सादर करावा. अशा विध्वंसक वातावरणात पीडितेसाठी काही चांगले करता येते का यासाठी प्रयत्न करू, असे सरन्यायाधीश म्हणाले.

सीबीआयने केला गुन्हा दाखल
सीबीआयने उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातप्रकरणी याआधी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सीबीआयने आता आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्यांच्या भावासह 10 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 15 ते 20 लोकांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारीचा कट या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभेत गदारोळ, विरोधकांचा सभात्याग
उन्नाव बलात्कार पीडितेला ठार मारण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार कुलदीप सेंगर यांनी केल्याचा आरोप करत आज काँगेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी लोकसभेत जोरदार गदारोळ करत सभात्याग केला. आझम खान यांच्या टिप्पणीबाबत सत्ताधारी आक्रमक होते मग आता उन्नावमध्ये एका मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतरही सरकार मूग गिळून गप्प का, असा सवाल विरोधकांनी केला.

लोकसभेत काँगेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी उन्नावचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर चौफेर टीका केली. आझम खानप्रकरणी सत्ताधारी पक्ष आक्रमक होता, मग आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सत्ताधारी उन्नावच्या घटनेबाबत गप्प का, असा सवाल केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अजूनही धमक्या येत आहेत. त्यांच्या जीविताला धोका आहे. केवळ सीबीआय चौकशीची घोषणा करून चालणार नाही. सरकारने याप्रकरणी निवेदन करावे अशी मागणी अधीररंजन यांनी केली, मात्र सत्ताधारी पक्षाकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँगेस, समाजवादी पार्टी, बसपाच्या खासदारांनी सभात्याग केला.

आपली प्रतिक्रिया द्या