मुलांना फुंकर मारुन जेवण भरवताय, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

तुमच्या बाळाला गरम जेवण फुंकर मारुन भरवायची सवय असेल तर ती तुम्हाला भारी पडू शकते. ही सवय मुलांच्या दातांसाठी घातक ठरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे मुलांचे दात निरोगी ठेवायचे असतील तर अन्नावर फुंकर मारू नका.

आपल्या बाळाचे पालनपोषण करण्याबाबत पालक दक्ष असतात. बाळाला जेवण भरवताना त्याला चटका बसणार नाही यासाठी आई प्रत्येक घास हा फुंकर मारुन भरवते. मात्र या सवयीमुळे बाळाच्या दातांवर परिणाम होऊ शकतो. दात येण्यापूर्वीच मुलाचे दंत आरोग्य खराब होऊ शकते. ऑस्ट्रेलियन अभ्यासानुसार अनेक बाळांना त्यांच्या आईकडून स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स हे किटाणू मिळतात. जेव्हा पालक अन्नावर फुंकर मारुन बाळाला अन्न भरवतात त्यावेळी पालकांच्या तोंडातील किटाणू अन्नावर बसतात व त्या अन्नावाटे मुलांच्या तोंडात जावू शकतात. एवढेच नाही तर एकाच चमच्याने खाल्ल्यावर आणि बाळाच्या ओठांवर चुंबन दिल्यानंतरही हे किटाणू बाळाच्या तोंडात जाऊ शकतात.

या अभ्यासानुसार आपल्या दातात असलेले किटाणू फुंकरच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडात जाऊ शकतात. जर दातांमध्ये पोकळी असेल आणि बाळाचे जेवण फुंकून भरवत असाल तर तुमच्या तोंडातील किटाणू बाळाच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. जेव्हा हे किटाणू संपर्कात येताच बाळाचे दात येण्यापूर्वीच दातांवर प्लाक जमा होण्यास सुरवात होते आणि त्यामुळे मुलांच्या दातात पोकळी निर्माण होते. ते किटाणू दातांना लागेपर्यंत जवळपास पाच ते सहा महिने लागतात. त्याचवेळी दात येण्याच्या वयात मुलांच्या दातांवर किटाणूची लागण होते.

काय काळजी घ्यावी

– बाळाला जेवण भरवताना त्यावर फुंकर न मारता पंख्याखाली किंवा वेगळ्या पद्धतीने ते थंड करावे.

– बाळाला ज्या चमच्याने भरवाल त्याच चमच्याने तुम्ही खाऊ नका.  तसेच एकाच ग्लासमधून पाणी पिऊ नका.

– जेवल्यानंतर बाळाचे तोंड ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे.

– तसेच बाळाची दातांबरोबरच त्याची जीभ दररोज स्वच्छ करावी

आपली प्रतिक्रिया द्या