चीन हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा करत असताना मोदी शांत का? ओवैसींचा सवाल

चीनने अरुणाचल प्रदेशमधील सीमाभागात जवळपास साडे चार किलोमीटर घुसखोरी करून नवीन गाव वसवल्याचे समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही मोदींना सवाल केला आहे. चीन हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा करत असताना मोदी शांत का? असा सवाल ओवैसींनी केला.

चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेश, लडाख आणि सिक्कीमध्ये जमिन बळकावत आहे. नव्याने समोर आलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये अरुणाचल प्रदेशात चीनने पक्के बांधकाम केल्याचे दिसत आहे. चीन हिंदुस्थानची जमिन बळकावत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे शांत कसे? असा सवाल ओवैसी यांनी केला. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?

लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही, तोच आता विस्तारवादी भूमिका असलेल्या चीनने हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेशमध्येही आणखी एक आगळीक केली आहे. चीनने तब्बल साडे चार किलोमीटर आत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे या भागात चीनने नवीन गाव वसवले असून 101 घरेही बांधली आहेत.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किनाऱ्याजवळ चीनने हे नवीन गाव वसवले आहे. याचे सॅटेलाईट फोटोही समोर आले आहेत. या भागावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असून मागे सशस्त्र संघर्षही झाला होता. परंतु आता चीनने येथे एक अख्खे गावच वसवल्याचे समोर आल्यानंतर हिंदुस्थानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या