कर्नाक पुलाचे रुंदीकरण करा, पण सर्वेक्षणाआधी रहिवाशांना विश्वासात घ्या! शिवसेनेची पालिका प्रशासनाकडे जोरदार मागणी

कर्नाक पूल रुंदीकरणात येणाऱ्या देऊळ, व्यायामशाळेला दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. पण रुंदीकरणाच्या सर्वेक्षणासाठी आठ इमारतींना बजावण्यात आलेल्या नोटिसींचा फटका 450 कुटुंबांना बसणार आहे. आमचा सर्वेक्षणाला विरोध नाही, मात्र सर्वेक्षण करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्या, अशी मागणी करत शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बुलडोझरच्या मदतीने देऊळ आणि व्यायामशाळा तोडण्याचा घाट शिवसेनेने हाणून पाडला.

मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाचे रुंदीकरण केले जाणार असून त्यासाठी प्रस्तावित रुंदीकरणात येणाऱया देऊळ, व्यायामशाळेला पूर्णपणे इतरत्र हलवण्यात येणार आहे. परिसरातील आठ इमारतींचा काही भाग निष्कासित करण्यात येणार असून त्यासाठी इमारतींच्या मालकांना सर्वेक्षणाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचा फटका सुमारे 450 कुटुंबांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर या स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

पुनर्वसन इथेच करा

मुंबई महापालिकेच्या ‘बी’ विभागाने सर्वेक्षणासाठी सिमेंट चाळ, जनाबाई आणि माधवराव रोकडे म्युनिसिपल शाळा, हीरामहल बिल्डिंग, ढोबळे बिल्डिंग, लेखराज बिल्डिंग, भोपळा बिल्डिंग, महाबळेश्वरवाला  बिल्डिंग, जितेकर  बिल्डिंग, विघ्नहर सदन या इमारतींच्या मालकांंना सर्वेक्षणासाठी नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसांमध्ये इमारतींचा काही भाग हा निष्कासित केला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रहिवासी आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर रुंदीकरण झालेच तर या इमारतींच्या रहिवाशांचे पुनर्वसन इथेच करा, अशी शिवसेनेची मागणी आहे, असे पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले. यावेळी शाखाप्रमुख स्वप्नील कोळी, कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप, उपविभागप्रमुख संतोष शिंदे, माजी शाखाप्रमुख हेमंत कोळी, बाबा परुळेकर, शाखा संघटक रंजना एकावडे यांच्यासह मोठय़ा प्रमाणात रहिवासी, दुकानदार उपस्थित होते.