बायकोने नवऱ्याला कुकर फेकून मारला, नवऱ्याची कोर्टात धाव

132

सामना ऑनलाईन, पुणे

पुण्यातील महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे पत्नीपीडित पतीने बायकोकडून होणारी मारहाण थांबवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. व्यवसायाने अभियंता असलेल्या या नवऱ्याला त्याच्या बायकोने कुकर फेकून मारला होता. किरकोळ कारणावरून ती आपला छळ करत असून तिने मारहाण देखील सुरू केली आहे असं या नवऱ्याने त्याच्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी बायकोला मारहाण न करण्याची तंबी दिली आहे.

तक्रारदार नवरा आणि त्याची बायको हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. हे दोघे एकाच भागात रहात होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सगळं व्यवस्थित होतं. मात्र काही महिन्यांनंतर बायकोने आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली असं नवऱ्याने म्हटलं आहे. बायकोने आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचाही त्याने आरोप केला आहे. बायकोने नवऱ्याविरोधात आणि त्याच्या आईवडीलांविरूद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार आपल्याला त्रास देण्यासाठी दाखल केल्याचं नवऱ्याचं म्हणणं आहे.

नवऱ्याने दंडाधिकाऱ्यासमोर केलेल्या याचिकेत म्हटलंय की 21 जानेवारीला बायकोने त्याला कुकर फेकून मारला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घरातील सतत भांडणं, मुलांकडे लक्ष न देणं, शिवीगाळ आणि मारहाण यामुळे आपण त्रस्त झालो असून यातून दिलासा मिळावा यासाठी नवऱ्याने न्यायाधीशांना विनंती केली आहे. यावर न्यायाधीशांनी तक्रारदाराच्या बायकोला पुन्हा असे प्रकार करू नये असा सज्जड दम दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या