नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे 15 दिवसांपूर्वी आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. चारित्र्याच्या संशयावरून त्रास देणाऱया पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा कापून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला इंदापूर तालुक्यातील लोणी येथून अटक केली.
अंबादास भानुदास म्हस्के (रा. जुना जालना) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी मीना अंबादास म्हस्के, प्रियकर लहू शिवाजी डमरे (वय 31, रा. ढोकसर, ता. बदनापूर) यांना अटक केली आहे.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात शुक्रवार (दि. 16) अनोळखी व्यक्तीचा गळा कापून खून झाल्याची फिर्याद पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी नेवासा पोलिसांत दिली होती. या गुह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पटली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीमध्ये घटनास्थळी एक चारचाकी मोटार संशयितरीत्या फिरताना आढळली होती. या मोटारीची माहिती काढली असता, ती मृत अंबादास यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेता त्याचा फोन 15 दिवसांपासून बंद असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी मीना हिची माहिती मिळविली. ती इंदापूर तालुक्यातील लोणी येथे राहत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन मीना व तिचा प्रियकर डमरे यास ताब्यात घेतले. डमरेकडे चौकशी केली असता, त्याचे मीनासोबत प्रेमसंबंध असून, त्याने व मीना याने अंबादासचा खून केल्याची कबुली दिली.