प्रेमात पडल्यावर माणसं काय करतील याचा नेम नाही. मग अगदी प्रेमासाठी जीव द्यायला किंवा कुणाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानात उघडकीस आली आहे. प्रियकरासाठी महिलेने पतीचाच काटा काढला आहे. यानंतर पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र खाकी नजरेने गुन्हेगारांना हेरलेच. हत्येची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. केसंता आणि बाबुलाल मीना अशी आरोपींची नावे आहेत. तर मुरारी लाल असे पीडित पतीचे नाव आहे.
दोसा जिल्ह्यातील जेलमपुरा गावात मुरारी लाल आणि केसंता राहत होते. याच गावात केसंताची बाबुलालसोबत ओळख झाली. मग दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. केसंताला बाबुलालशी लग्न करायचे होते. मात्र पती मुरारी यात अडथळा ठरत होता. यामुळे केसंता आणि बाबुलालने एक योजना आखली.
केसंताने सर्वप्रथम मुरारीला ट्रकवर कामगार म्हणून नोकरी मिळवून दिली. यानंतर पतीला प्रियकरासोबत ट्रकवर कामाला पाठवले. बाबुलाल आणि मुरारी बेरवा असमहून दौसाला चालले होते. मात्र सिकंदरा ठाण्याच्या हद्दीत रेटा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक थांबवला. यानंतर बाबुलालने मुरारीला दारु पाजली. मग त्याला ट्रकखाली चिरडले. दुसऱ्या दिवशी महामार्गावर मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली.
सुरुवातीला पोलिसांना हा अपघातच असल्याचे वाटले. मात्र तपासादरम्यान पोलिसांना हत्येची शंका आल्याने त्यांनी त्या दृष्टीने तापस सुरु केला. पोलिसांनी मयताच्या मृत्यूप्रकरणी पत्नीची चौकशी केली. तसेच तिचा मोबाईल चेक केला असता पोलिसांचा संशय वाढला. बाबुलालने मेसेजद्वारे केसंताला हत्येची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.