‘त्यांच्या’ आनंदासाठी पती घेणार पत्नीपासून घटस्फोट, वाचा अजबगजब प्रकरण

5520

‘पती, पत्नी आणि तो’ यांची अनेक प्रकरणे आपण पाहिले आहेत. यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही बनले. मात्र भोपाळमध्ये घडलेले अजबगजब प्रकरणही चित्रपटाच्या कथेला साजेसेच आहे. येथे पत्नीला पहिल्या प्रियकरासोबत आनंदाने आयुष्य व्यतित करता यावे म्हणून पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी भोपाळमधील कोलार भागातील ही घटना आहे.

कल्पना (काल्पनिक नाव) ही फॅशन डिझायनर आहे, तर राजेश (काल्पनिक नाव) हा सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. सात वर्षापूर्वी दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते. या दोघांना दोन मुले ही आहेत. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरू असतानाच कल्पनाच्या आयुष्यात पूर्वाश्रमीचा प्रियकर परत आला आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडली. या कारणामुळे पती-पत्नीत दुरावा वाढू लागला. विशेष म्हणजे प्रियकरासाठी कल्पना घरही सोडण्यास तयार झाली. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले.

न्यायालयात सुनावणी सुरू असताना कल्पनाने लग्नाआधी आपले एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले. परंतु प्रियकर दुसऱ्या जातीचा असल्याने आणि वडिलांना आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने हे लग्न झाले नाही. त्यामुळे कल्पनाला वडिलांनी सुचवलेल्या तरुणासोबत लग्न करावे लागले. मात्र कल्पनाने विवाह केला असला, तरी तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रेमात वेडा झाला होता आणि त्याने अद्यापही लग्न केले नसल्याचे समोर आले. लग्नानंतर सात वर्षांनी कल्पनाच्या आयुष्यात तो पुन्हा एकदा आला. अखेर पत्नीच्या इच्छेखातर पती राजेशने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तसेच पत्नी मुलांचा सांभाळ करण्यासाठी तयार होती, मात्र राजेशने आपण मुलांचे पालन-पोषण करण्यास सक्षम असल्याचे सांगितले. न्यायालयात ही ही कहानी ऐकून काऊन्सलरही अचंबित झाले.

आपली प्रतिक्रिया द्या