पतीच्या कमाईवर पत्नी अवलंबून राहू शकत नाही!

15

दिल्लीतील न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली

पतीकडून मिळणाऱ्या पोटगीचा हप्ता वाढवून देण्याची महिलेची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. पतीपेक्षा अधिक शिक्षण झालेले असताना महिला घरी बसून पतीच्या कमाईवर अवलंबून राहू शकत नाही, असा निकाल दिल्लीतील सत्र न्यायालयाने दिला.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पतीपासून वेगळे राहणाऱ्या दिल्लीतील एका महिलेने पतीकडून मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. दिल्ली सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आर. के. त्रिपाठी यांच्या पीठासमोर महिलेच्या याचिकेवर सुनावणी झाली. महिलेला सध्या पतीकडून महिन्याला ५ हजार ५०० रुपये भत्ता मिळतो. तो २५ हजार रुपये इतका मिळावा असे महिलेने याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्ता महिला पतीपासून वेगळी राहते. पतीपेक्षाही तिचे जास्त शिक्षण झालेले आहे. एम.ए., बी.एड. आणि एलएलबी पदव्या घेतलेल्या असताना घरी बसून आहे. घरी बसून पतीकडून मिळणाऱ्या भत्त्यावर ती अवलंबून राहत आहे. वेगळे झाल्यानंतरही महिला पतीच्या कमाईवर विसंबून राहू शकत नाही, असे सांगत न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावली.

महिलेला ५ हजार रुपये भत्ता मिळत होता. २००८ मध्ये महिलेच्या भत्त्यात १० टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या तिला ५ हजार ५०० रुपये महिन्याला मिळत असून कोणतेही कारण न देता २५ हजार रुपये भत्ता मिळण्याची मागणी कोणत्या आधारावर केली आहे, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला होता.

याचिककर्ता महिला स्वत: पतीपेक्षा जास्त शिकलेली आहे. पदव्युत्तर पदव्या मिळवलेल्या असताना पतीच्या कमाईवर विसंबून घरी बसून राहू शकत नाही.
– आर. के. त्रिवारी, न्यायमूर्ती

आपली प्रतिक्रिया द्या