दादर फूलमार्केटमधील हत्येचा उलगडा, पत्नीच्या प्रियकराने केला होता गोळीबार

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । मुंबई

दादरच्या फूलमार्केटमध्ये 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून केलेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश आले आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी मनोज मौर्य (35) याची गोळ्या झाडून हत्या केली होती. मनोज हा फूलमार्केटमध्ये इलेक्ट्रिक वजन काटा पुरवण्याचे काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली असून, यातील मुख्य आरोपीचे मनोजच्या पत्नीसोबत लग्नाअगोदर प्रेमसंबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी मनोजवर गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या मनोजला नागरिकांनी तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मनोज याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी राधेकृषण कुशवा (37), राजेंद्र अहेरवा (30), हेमेंद्र कुशवा (19) आणि पुरषोत्तम सक्सेना (37) यांना अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी न्यायालयात आरोपींविरोधात 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये मोबाईलचे सीडीआर, आरोपींनी उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्यासाठी वापरलेली रेल्वेची तिकिटे, गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या गावठी कट्ट्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट, प्रत्यक्षदर्शींने दिलेली साक्ष, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि मनोज मौर्याच्या मृत्यूचा दाखला या सर्वांचा समावेश आहे. या आरोपपत्रात मुख्य आरोपी राधेकृषण कुशवा आणि मनोजच्या पत्नीचे लग्नाअगोदर प्रेमसंबंध असल्याचे नमूद केले आहे. मात्र, मनोजच्या हत्येप्रकरणात त्याच्या पत्नीची नेमकी काय भूमिका होती, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.