सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजारात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

सामना प्रतिनिधी । सिल्लोड

सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे बुधवार, १५ ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी मध्यरात्री २ च्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीचा धारदार कुऱ्हाडीने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पती फरार झाला.

रवींद्र साहेबराव बनकर (३०) व त्याची पत्नी मंगलाबाई रवींद्र बनकर (२८) हे मुरलीधर सांडू इंगळे यांच्या घरात भाड्याने राहत होते. बुधवारी रात्री ते घरात झोपले होते. रवींद्रच्या डोक्यात पत्नीबद्दल चारित्र्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून संशय होता. याच संशयातून त्याने मंगलाबाईच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून जिवे मारले व त्यानंतर मध्यरात्रीच फरार झाला. सकाळी घरातील सदस्य उठवण्यासाठी गेले असता मंगलाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. कुऱ्हाडही बाजूलाच पडलेली होती. या घटनेची माहिती कळताच गावात तसेच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार घटनास्थळी दाखल झाले.

रवींद्र बनकर व मंगलाबाई यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. त्यांना मुलगा, मुलगी असे अपत्य आहे. मंगलाबाई यांचे माहेर कन्नड तालुक्यातील दिगाव येथील आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून भांडणे होत होती. रवींद्र व त्याच्या कुटुंबातील सदस्य नेहमीच मंगलाबाईला चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करत होते, असे मृत मंगलाबाईचे वडील सूर्यभान सुसंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी सूर्यभान किसन सुसंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृताचे पती रवींद्र साहेबराव बनकर, सासू लंकाबाई साहेबराव बनकर, सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर व जाऊ शीतल अशोक बनकर रा. देऊळगाव बाजार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात सासऱ्याला व दिराला अटक करण्यात आलेली असून, उर्वरित आरोपींचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे, तसेच सपकाळ, ढाकले हे करीत आहेत. यातील महिला आरोपींना न्यायालयीन, तर पुरुष आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
मृताच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घालीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जोपर्यंत मुख्य आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र पोलिसांनी आम्ही लवकरात लवकर मुख्य आरोपीस जेरबंद करतो, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. देऊळगाव बाजार येथे पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.