संगमेश्वर तालुक्यात रानगव्याचा चिखलात अडकल्याने मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे भागात एका गव्याचा मृत्यू झाला आहे. गडनदीच्या चिखलात अडकल्याने या  गव्याचा मृत्यू झाला आहे. काही नागरिकांना नदीकाठाजवळच्या चिखलात हा गवा मृतावस्थेत आढळून आला होता. मावळंगे पोलीस पाटील दत्ताराम मोरे यांना ग्रामस्थांनी मृत रान गव्याचे वृत्त सांगितले . मोरे यांनी तत्काळ देवरुख वन विभागाजवळ संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली . वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी दोरीच्या सहाय्याने मृत गव्याला पाण्याबाहेर काढले. गव्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा अथवा जखम नसल्याचे दिसून आले . चिखलाचा आणि पाण्याचा अंदाज न आल्यानेच चिखलात अडकून गव्याचा मृत्यू झाल्याचे पशुधन अधिकारी आणि वन विभागातर्फे सांगण्यात आले. तौक्ते वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी अचानक वाढली असावी आणि त्याचा अंदाज न आल्याने गवा चिखलात अडकून दगावला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या