चवताळलेल्या हत्तीने घेतला महिला पर्यटकाचा जीव; तामिळनाडूत हत्तीचे पाय साखळदंडानी जखडले

निर्दोष मुक्या प्राण्यांवर क्रूरपणे अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मानवाचे निर्सगावर अतिक्रमण वाढत असल्याने वन्य प्राणीही आक्रमक होत आहेत. आक्रमक होणारे वन्य प्राणी आणि प्राण्यांवर होणारे अत्याचार या घटना तामिळनाडू आणि केरळ राज्यात घडल्या आहेत.

केरळच्या वायनाडमध्ये चवताळून आक्रमक झालेल्या हत्तीने एका महिला पर्यटकाचा जीव घेतला आहे. तर तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीमध्ये एका हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचे पुढचे पाय लोखंडी साखळदंडाने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे लंगडत आणि उड्या मारत हत्तीला चालावे लागत आहे.

वायनाडमध्ये हत्तीच्या आक्रमकपणामुळे एका महिलेचा बळी गेला आहे. तर तिरुनेलवेलीमध्ये हत्तीचे पाय जखडून अमानवीय आणि क्रूर घटना घडल्याचे दिसून येत आहे. नुकतेच एका हत्तीच्या कानात जळते कापड फेकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच हत्तीचे पाय साखळदंडानी जखडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

केरळच्या वायनाडमधील मोप्पाडी भागात शनिवारी रात्री टेंट कॅम्पमध्ये झोपलेल्या महिलेवर आक्रमक हत्तीने हल्ला चढवला. त्यात तिचा मृत्यू झाला. ती महिला पर्यटक कन्नूरची असून शहाना (26) असे तिचे नाव आहे. ती काही नातेवाईकांसह वायनाडच्या एका रिसोर्टमध्ये आली होती. तिथे जंगलात एका टेंटमध्ये रात्र घालवण्याचा निर्णय तिने घेतला. हा निर्णय तिच्या जीवावर बेतला आहे.

टेन्टमध्ये झोपायला जात असताना आक्रमक हत्तीने तिच्यावर हल्ला केला. तिला सोंडेत पकडून हत्तीने आपटले. त्यानंतर तिला चिरडले. तसेच टेंटही उद्ध्वस्त केल्यानंतर तो निघून गेला. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेच्या चोकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

तामिळनाडूमध्ये हत्तीशी क्रूरपणा करण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हत्तीचे पुढचे पाय लोखंडाच्या साखळदंडानी बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हत्तीला चालताना त्रास होत आहे. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे क्रूर कृत्य करण्यात आले आहे.

हत्तीचे वजन सुमारे 4.5 टन असते. जास्त वजन असल्याने त्याची चालण्याची विशिष्ट पद्धत असते. त्यामुळे त्याला शरीराचे संतुलन राखत चालणे शक्य होते. मात्र, हत्तीचे पाय जखडण्यात आल्याने त्याला चालणेही कठीण होत आहे. या अमानवीय घटनेची सूचना वन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या