हिंदीची बळजबरी नको, मातृभाषा अग्रस्थानी! – पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांचा केंद्राला इशारा

364

आमच्यावर हिंदी भाषा लादण्याची बळजबरी आम्ही कदापिही सहन करणार नाही. राज्यात आमची मातृभाषा तमिळचे महत्व कायम राखण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, अशी गर्जना करीत केंद्रशासित राज्य पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केंद्र सरकारला इशाराच दिला.

तमिळ संत आणि कवी थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण पुडुचेरीच्या राजधानीत मंगळवारी नारायणसामी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्राने दिल्लीत आयोजिलेल्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांच्या राष्ट्रीय बैठकीत आम्ही आमचा द्विभाषिक फॉर्मुला स्पष्ट केला आहे. आम्ही आमची मायबोली तमिळला राज्यकारभारात अग्रस्थान देणार आहोत. त्यानंतर जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा सन्मान राखू. पण हिंदीची सक्ती मुळीच खपवून घेणार नाही.

शिक्षणमंत्री कमलाकन्नन म्हणाले, आपले कुणीही राष्ट्रीय बैठकीत नव्हते. मुख्यमंत्री नारायणसामी शिक्षणमंत्र्यांच्या राष्ट्रीय बैठकीचा हवाला देत असताना पुडुचेरीचे शिक्षणमंत्री आर. कमलाकन्नन मधेच उभे राहिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवत उत्तर दिले की, मुख्यमंत्री महोदय आपल्या राज्याकडून या राष्ट्रीय बैठकीला कुणीही गेले नव्हते. त्यामुळे हिंदी भाषेचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या बैठकीत आपला प्रतिनिधीच उपस्थित नसल्याने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भाषिक सक्तीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही.

आपली प्रतिक्रिया द्या