ऑनलाइन काम करणार नाही, शिक्षकांचा निर्धार

सामना प्रतिनिधी, येवला

ऑनलाइन कामाचा वाढता ताण व अर्थिक भुर्दंडामुळे येवला तालुक्यातील शिक्षकांनी ऑनलाइन कोणतेही काम करायचे नाही, असा निर्णय शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीने घेतला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी सुनील आहिरे व गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांना आज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अनेक शाळांकडे वीजपुरवठा नाही. दुर्गम भागातील शाळामध्ये इंटरनेट सेवा मिळत नाही. सर्वच शाळेकडे संगणक नाहीत. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक यांना तालुक्यातील सायबर कॅफेत जाऊन पदरमोड करून ऑनलाइन कामे करावी लागतात. शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद नाही. शालेय वेळेत व इतर वेळी रात्रंदिवस बसून ऑनलाइन कामे मुख्याध्यापक व शिक्षकांना करावी लागत आहेत. ऑनलाइनचे काम करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक बाहेर गेल्यानंतर पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकांकडून शाळेत गुरुजी कुठे गेले म्हणून विचारणा केली जाते, शासनाच्या कालमर्यादित काम पूर्ण करण्याच्या आदेशामुळे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे हाल होत आहेत.

या वेळी शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षक सेना, पदविधर शिक्षक संघटना अपंग कर्मचारी संघटना, शिक्षक सहकार संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या समन्वय समितीने गटविकास अधिकारी सुनील आहिरे व गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांना निवेदन दिले.

शिक्षक संघटनेच्या मागण्या
त्यात सर्व शाळांना अखंड वीजपुरवठा व वीज बिल भरण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, सर्व शाळांना संगणक संच देण्यात यावे, सर्व शाळांना नेट कनेक्टिव्हिटी व्यवस्था करण्यात यावी, सर्व शाळांना स्वतंत्र डाटा ऑपरेटर नेमावा, शिक्षकांना त्यांचे मूळ शिकविण्याचे काम करू द्यावे, शालेय पोषण आहार व ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे आदी मागण्या या वेळी निवेदनात करण्यात आल्या आहे.