कोकणचा गुजरात होऊ देणार नाही!

73

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकणची राखरांगोळी करू पाहणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त हातोडा मारला. ‘नाणार राहणार… प्रकल्प गेला! चला, आनंदोत्सव साजरा करा!!’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करताच ‘शिवसेना झिंदाबाद…. रिफायनरी हटाव, कोकण बचाव’च्या घोषणांनी अवघे कोकण दुमदुमून गेले. प्रकल्पाची पालखी खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी चांगलीच सालटी काढली. ते म्हणाले, ‘नाणारमध्ये हे शहा, मोदी, झवेरी नावाचे नवीन शेतकरी आले कोठून आणि कधी आले? यांनी जमिनी घेतल्या कधी आणि जमिनी घेताच प्रकल्पाची घोषणा झालीच कशी? कोकणचे हे असे गुजरात होऊ देणार नाही हे लक्षात ठेवा. हे असे गुजराती लोक कोकणच्या माथी येऊन बसणार असतील तर वेळ पडल्यास शिवरायांचे भगवे तेज काय असते ते दाखवून देईन, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी देताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला!

नाणार प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आज येथे आले होते. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर सागवे गावच्या विस्तीर्ण माळरानावर जमलेल्या हजारो ग्रामस्थांना उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले, ‘प्रकल्प जाणार म्हणजे जाणारच!’ प्रकल्प लादू पाहणाऱया केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या उद्धव ठाकरे यांनी पार चिंधडय़ा उडवल्या. कोकणची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालण्याचे कोणाच्या डोक्यात असेल तर आम्ही त्यांचीच राखरांगोळी करू हे  लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

कोकणी माणसाने काय भांडी घासायची?

रिफायनरी होऊन कोकणला काय मिळणार… काही नाही. जो पैसा येईल त्यातील अर्धा पैसा सौदी अरेबिया आणि अर्धा पैसा प्रधान- मोदींच्या खिशात जाणार. जमिनी विकून झालेला फायदा इथल्या मोदींच्या खिशात आणि प्रकल्पाचा फायदा दिल्लीतल्या मोदींच्या खिशात. मग कोकणी माणसाने फक्त भांडीच घासायची काय, असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे गरजले, इथे जमिनी घेणाऱ्या गुजरातींचे नुकसान होऊ नये म्हणून दिल्लीतील त्यांचेच लोक हा प्रकल्प रेटत आहेत.

नाणार राहणार, प्रकल्प जाणार

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना विचारले, नाणार जाणार की राहणार?… तेव्हा उपस्थितांनी एकसुरात आवाज दिला, जाणार… जाणार… जाणार! यावर उद्धव ठाकरे म्हणाले, अरे चुकताय तुम्ही. नाणार राहणार आणि प्रकल्प जाणार (प्रचंड टाळय़ा). जाणार कसला, प्रकल्प गेलाच म्हणून समजा. कारण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता होणारच नाही (टाळय़ा).

तुम्ही कोंबडी आणा, आम्ही वडे आणतो!

हा प्रकल्प गुजरातला जाईल अशी धमकी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरी’ भाषेत शरसंधान साधले. ते म्हणाले, हा प्रकल्प कोकणात नाही झाला तर गुजरातला जाईल, अशा धमक्या दिल्या जातात. अहो, बिनधास्त न्या गुजरातला. पण येथे कोकणात हा प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाही. गुजरातला प्रकल्प घेऊन जातो असे सांगून कोंबडय़ा झुंजवण्याचे काम तुम्हीच करा. तुम्ही कोंबडी आणा, आम्ही वडे आणतो (प्रचंड हंशा). भाजपचे आमदार आशीष देशमुख म्हणतात, प्रकल्प विदर्भात न्या म्हणून. पण गुजरातला घेऊन जाईन सांगायचे आणि परत तो कोकणच्याच माथी मारायचा हे खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

देशभक्ती आम्हाला शिकवू नका

दिल्लीतील मोदी-शहा यांनी देशभक्तीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. आम्हाला देशभक्ती माहिती आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. आमच्या नसानसात त्यांची शिकवण आहे. तुमची कसली शिकवण? तुमची शिकवण ऐकून आमच्या रक्ताची नासाडी करायची नाही असा सणसणीत टोला हाणतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, देशभक्ती जाणायची असेल तर आमच्या कोकणातील शिवतर गाव पहा. या गावातील प्रत्येक घरामध्ये एक सैनिक आहे.

एक कोपरा सभाघेऊन दाखवा

जे या ठिकाणी प्रकल्पाची तळी उचलत आहेत, प्रकल्प चांगला आहे म्हणून सांगत आहेत त्यांनी हिंमत असेल तर या ठिकाणी येऊन प्रकल्प कसा चांगला आहे हे सांगावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, ही इतकी मोठी सभा नाही, तर किमान एक कोपरा सभा घेऊन दाखवावी. सांगतात, इतका रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवसेना फक्त आगी लावायचं काम करत आहे असेही सांगतात. अरे, हिंमत असेल तर या ठिकाणी येऊनच दाखवा, असा आवाज उद्धव ठाकरे यांनी दिला.

दलालांना गावबंदी करा

प्रकल्पासाठी जमिनी घेण्याकरिता येणाऱ्या दलालांना हाकलवून लावा. त्या दलालांचे फोटो नाक्यानाक्यावर लावा. दलालांना गावबंदी करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना केले. उद्या जर तुमच्या घरावर वरवंटा फिरवून, दमदाटी करून तुमच्या जमिनीची मोजणी करण्याचा कुणी प्रयत्न केला तर माझे शिवसैनिक ती मोजणी उधळून लावतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला.

यावेळी शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, उपनेते उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, सुनील प्रभू, सदानंद चव्हाण, अजय चौधरी, शेतकरी, मच्छीमार, रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, अजित भाटकर, ओंकार प्रभुदेसाई, सचिव अरविंद सामंत यांच्यासह हजारो ग्रामस्थ आणि कोकणवासी उपस्थित होते.

अधिसूचना रद्द केली

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याच जाहीर सभेत नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरीची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने पेट्रोकेमिकल रिफायनरीची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा मी करतो. उद्या जर हा प्रकल्प कोणी कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी मी मंत्रीपदही सोडेन, असेही सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले तेव्हा ग्रामस्थांनी टाळय़ांचा कडकडाट केला. प्रकल्पाच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प नको असा प्रस्ताव केला आहे. तो प्रस्ताव सरकारला मान्य करावाच लागेल, असेही देसाई म्हणाले.

रद्द केलेली नाही!

सुभाष देसाईंनी अधिसूचना रद्द करण्याबाबतच मत व्यक्त केलं. पण ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे सरकारचं मत नाही. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उच्चस्तरीय समितीलाच आहे, तो अधिकार मंत्र्यांना नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार येथे भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजभवन येथील बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेला मुख्यमंत्री फडणवीस यांचा कॉनव्हॉय खास  प्रतिक्रिया देण्यासाठी रस्त्यावर थांबला.

मुख्यमंत्र्यांना दिल्लीत किंमत नाही याचा संताप यायला हवा!

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, त्या दिवशी भाई सामंत आणि काही मंडळी माझ्याकडे आली होती. ते म्हणाले की, आम्ही असंमतीपत्राचे गठ्ठे आणलेत. गठ्ठेच्या गठ्ठे होते. ते सर्व घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांना म्हटले, हे कोकणचे माझे बांधव तुम्हाला भेटायला आलेत. त्यांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांनी असंमतीपत्रं आणली आहेत. मुख्यमंत्री सुरुवातीला म्हणाले होते की, हा प्रकल्प खूप चांगला आहे. आम्ही खूप प्रयत्न करून तो आणलाय. म्हणजे बघा. हा प्रकल्पही मुख्यमंत्र्यांनीच आणलाय. जर लोकांचा विरोध असेल तर आम्ही हा प्रकल्प जनतेवर लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण झाले काय, तर दिल्लीत बसलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाबरोबर प्रकल्पाचा सौदा केला. प्रश्न फक्त फसवणुकीचा नाही किंवा संताप व्यक्त करण्याचा नाही, तर माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत काडीचीही किंमत नाही याचा संताप मराठी माणसाच्या मनात निर्माण झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कोकणी माणूस कदापि विकला जाणार नाही!

जनता काय मागते, तर घर, पाणी, वीज, रस्ते द्या. पण येथील ग्रामस्थ मात्र तुम्ही जे देताय ते परत घ्या अशी मागणी करतायत. असे देशात पहिल्यांदाच घडते आहे. जमिनीचा चार-पाच पटींनी जास्त मोबदला तुम्ही देणार असे कानावर आले आहे. पण एक लक्षात ठेवा, पैशांच्या कितीही राशी ओतल्या तरी कोकणी माणूस, शिवबाचा मावळा कदापि विकला जाणार नाही (टाळय़ा) असे ठामपणे बजावतानाच उद्धव ठाकरे यांनी, एक इंचही जागा विकू नका. तुमच्या ग्रामदेवतेसमोर शपथ घ्या की मी एक इंचही जागा विकणार नाही, असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.

फटकारे

गुजरातला प्रकल्प घेऊन जातो असे सांगून कोंबडय़ा झुंजवण्याचे काम तुम्हीच करा. तुम्ही कोंबडी आणा, आम्ही वडे आणतो.

पैशांच्या कितीही राशी ओतल्या तरी कोकणी माणूस, शिवबाचा मावळा कदापि विकला जाणार नाही

धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाबरोबर सौदा करत शिवसेनेवर टीका करणाऱ्यांच्या तोंडात सौदी अरेबियाचा बोळा कोंबला आहे आणि लोकांना दाखवून दिले की, या प्रकल्पामागे शिवसेना नसून अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवणारेच आहेत,

माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत काडीचीही किंमत नाही याचा संताप मराठी माणसाच्या मनात निर्माण झाला पाहिजे.

दिल्लीतील मोदी-शहा यांनी देशभक्तीच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. आम्हाला देशभक्ती माहिती आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची.

 तर सरकारच तोडूनमोडून टाकू!

तुम्ही हा प्रकल्प गुजरातला न्या नाहीतर कुठेही न्या, पण जर मराठी माणूस, शेतकरी, माताभगिनींच्या मुळावर हा प्रकल्प येणार असेल तर आम्ही फक्त आवाजच उठवणार नाही, तर हे सरकारच तोडूनमोडून टाकू, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.  नाणारबरोबरच अणुऊर्जा प्रकल्पही अहमदाबादमध्ये न्या, असेही ते म्हणाले.

 धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधकांच्या तोंडात बोळा कोंबला

एक षड्यंत्र रचलं जात होतं. हे सर्व आणलं कोणी हे सांगण्यासाठी भांगडा केला जात होता. हा प्रकल्प शिवसेनेने आणला. हे सर्व सुभाष देसाई यांनी केलं म्हणून खपवलं जात होतं. पण मी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाबरोबर सौदा करत शिवसेनेवर टीका करणाऱ्यांच्या तोंडात सौदी अरेबियाचा बोळा कोंबला आहे आणि लोकांना दाखवून दिले की, या प्रकल्पामागे शिवसेना नसून अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवणारेच आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या