राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला विरोधकांचा पाठींबा मिळणार..?

कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी बोलताना आज सांगितले की 3 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेस कोणत्या पक्षांचा पाठींबा मिळणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल. कॉंग्रेस पक्षाने इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भारत जोडो यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रीय लोक दल नेते जयंत चौधरी यांचा समावेश आहे. सध्या या यात्रेने नऊ दिवसांचे अंतर घेतले आहे. उत्तर प्रदेशपासून पुन्हा या यात्रेस सुरुवात होईल.

यातील प्रमुख विरोधी पक्ष नेते या यात्रेत सामील होणार नाहीत असे अंतस्थ सूत्रांकडून समजते आहे.
याबाबत बोलताना जयराम रमेश यांनी सांगितले की आत्ताच आम्ही कोणत्याही निष्कर्षाप्रत येणार नाही. यात्रा जेव्हा पुन्हा सुरु होईल तेव्हा समजेलच कोण येणार किंवा कोण नाही.

ही यात्रा म्हणजे कोणतेही चुनाव जितो लक्ष्य नसून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसे जोडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे असे जरी कॉंग्रेस पक्षाकडून सातत्याने सांगण्यात येत असले तरी हे सगळेच जाणून आहेत की 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीसाठी कॉंग्रेसची ही जबरदस्त मोर्चेबांधणी आहे.

राहुल गांधींसोबत इतर विरोधी पक्ष नेते या यात्रेत सामील झाले की कॉंग्रेस पक्षासमवेत साऱ्याच विरोधी पक्षांची एकजूट दिसून येईल. पण जयराम रमेश यांनी या शक्याशक्यता पूर्ण फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी प्रतिपादन केले की जेव्हा कॉंग्रेस पक्ष स्वत:च अत्यंत खंबीर पक्ष होईल तेव्हाच विरोधकांच्या एकजुटीला आम्ही बळ देऊ शकू. आम्ही सध्या फक्त आमचा पक्ष मजबूत करत आहोत.

सूत्रांकडून असे समजते की अखिलेश यादव स्वत: या यात्रेत सामील होणार नाहीत शिवाय त्याचा कोणी प्रतिनिधी पाठवायचा की नाही याविषयी अजून निर्णय झालेला नाही. राष्ट्रीय लोक दलाचे प्रवक्ते रोहित जाखर यांनी सांगितले की आम्ही यात्रेत सामील जरी होणार नसलो तरी या यात्रेला आमचा पाठींबा आहे. राजस्थानमध्ये आम्ही कॉंग्रेसोबतच आहोत. त्यामुळे आमचा पाठींबा त्यांना आहेच.