INDvsAUS यजमानांना धक्का, सलामीवीर खेळाडू चौथ्या कसोटीला मुकणार

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात उद्या (15 जानेवारी) पासून चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू होत आहे. ब्रिस्बेनमध्ये हा सामना रंगणार आहे. मालिका 1-1 बरोबरीत असून दोन्ही संघ विजयाच्या इर्षेने मैदानात उतरतील.

दरम्यान, निर्णायक कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाला तगडा धक्का बसला आहे. सिडनीमध्ये पदार्पणाचा सामना खेळलेला सलामीवीर विल पुकोवस्की ब्रिस्बेन कसोटीला मुकणार आहे. पुकोवस्की याच्या खांद्याला दुखापत झाली असून यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही. त्याच्या जागी मार्कस हॅरिसचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने पुकोवस्की फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही अशी माहिती दिली. त्यामुळे तो चौथा कसोटी सामना खेळणार नाही. त्याने सकाळी सरावाचा प्रयत्न केला, मात्र दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्याच्या जागी मार्कस हॅरिसचा संघात समावेश करण्यात आला आहे. तोच वॉर्नसोबत सलामीला येईल.

दरम्यान, मार्कस हॅरिस याने अखेरचा कसोटी सामना गेल्या वर्षी अॅशेस मालिकेत खेळला होता. आतापर्यंत त्याने 9 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून 385 धावा केल्या आहेत.

निर्णायक सामना

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना ब्रिस्बेनमध्ये रंगणार आहे. गाबावर ऑस्ट्रेलियाची कामगिरी जबरदस्त असून 1988 पासून येथे एकही सामना यजमान संघाने गमावलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानी संघाचे येथे कस लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या