गर्भपाताचा धंदा करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार – डॉ. दीपक सावंत

सामना ऑनलाईन, मुंबई –

सांगली जिह्यातील म्हैसाळ येथे घडलेल्या स्त्रीभ्रूण हत्येत मिरज, सातारा आणि कोल्हापूर येथील डॉक्टरही गुंतले असून असे गैरकृत्य करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही. यामधील दोषींना कठोर शिक्षा करणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भातील चर्चेला उत्तर देताना डॉ. दीपक सावंत म्हणाले, सांगलीतील गर्भपाताचे रॅकेट हे २००९ सालापासून सुरू होते. या रॅकेटची व्याप्ती फार मोठी आहे. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे जरी या रॅकेटचा सूत्रधार असला तरी सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागातील डॉक्टरही यात सहभागी आहेत. अगदी कर्नाटकमधूनही सोनोग्राफी रिपोर्ट काढण्यात येत होते, असे साकंत यांनी सांगितले.

डॉ. खिद्रापुरेला अटक

स्त्रीभ्रूण हत्या करणारा क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी मध्यरात्री बेळगाव येथून अटक केली. गेले चार दिवस तो पोलिसांना चकवा देत होता. आज मिरज न्यायालयाने त्याला दहा दिवसांची (१७ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज म्हैसाळ गावास भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. तर डॉ. खिद्रापुरेच्या निषेधार्थ पुकारलेल्या म्हैसाळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या