उत्तर प्रदेशमधल्या जागा न राखल्यास राजकारण सोडून देईन : अमित शहा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2014 साली भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागांवर यश मिळवले होते. यंदाही 73 जागांवर यश मिळणार असा विश्वास भाजपध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच हे खरे नाही ठरले तर आपण राजकारणातून निवृत्त होऊ असेही शहा म्हणाले. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाची आघाडी झाली आहे. याचा भाजपला फटका बसणार का? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले की, “आता मतदार शहाणा झाला आहे. निर्णय घेण्यास तो सक्षम झाला आहे. या निवडणुकीत आम्ही 73 किंवा 74 पेक्षा अधिक जागा जिंकू. 73 खाली आकडा येणार नाही. असे झाले तर मी राजकारणातून निवृत्त होईन” असे शहा म्हणाले.

आडवाणी आणि मुरली मनोहर जोशीं सारख्या बुजुर्ग नेत्याचे तिकीट का कापले या प्रश्नावर शहा म्हणाले की, असे 12 नेते आहेत ज्यांचे वय 75 हून अधिक आहे. ते यंदा निवडणूक लढवत नाही. त्यात शांता कुमार, बी.सी खंदुरी, भगत सिंह कोश्यारी, हुकुमदेव आणि सुमित्राताई महाजन यांचे वय 75 पेक्षा जास्त असल्याने ते निवडणूक लढवत नसल्याचे शहा यांनी सांगितले.

सवर्ण आरक्षण हा निर्णय राजकीय नसून सामाजिक होता असे अमित शहा म्हणाले. तीन राज्यात भाजप हरल्यानंतर हा निर्णय का घेतला यावर शाह यांनी हे उत्तर दिले. अनेक समजांमध्ये असंतोष होता. त्यांच्या मागण्या पूर्ण करणे हे गरजेचे होते. मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपला मत देणारेच खरे देशभक्त असतात असे आमचे म्हणने नाही असे अमित शहा म्हणाले. तसेच जे भाजपला मतदान करत नाहीत त्यांना आपले स्वातंत्र्य असल्याचेही शहा म्हणाले.