गोदावरी शुद्धीकरणाचे काम हाती घेणार; नैसर्गिक नाल्यांचे सुशोभिकरण करणार – महापालिका आयुक्त कैलास जाधव

kailas-jadhav

पवित्र गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आणि तिच्या शुद्धीकरणासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. शहरातील लहान-मोठे 67 नाले जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे सरळीकरण, खोलीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येईल. कुठल्याही बिल्डरला यापुढे या नाल्यांवर अतिक्रमण करू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

एक महिन्यापूर्वी पदाचा कार्यभार घेताच कोरोना आटोक्यात आणण्यावर लक्ष केंद्रीत केले. ‘मास्क बंधनकारक, सुरक्षित अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता’ या त्रिसूत्रीतून जनजागृती केली. संशयित रुग्णांची वेळीच तपासणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. दररोज बाराशेपर्यंतची रुग्णसंख्या आता पाचशेच्याही खाली आली आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. नाशिक शहरातील मृत्यूचे प्रमाण हे देशात सर्वात कमी म्हणजे 1.41 टक्के इतके आहे, देशाचे प्रमाण 1.6 इतके आहे. रुग्ण बरे होण्याचे राज्याचे प्रमाण 85 टक्क्यांपर्यंत, तर नाशिकचे 92 टक्के इतके आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

दुसरी लाट आलीच तर…

नोव्हेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, असा जागतिक आरोग्य संघटनेसह तज्ञांचा अंदाज आहे. तसे होवू नये, पण झालेच तर ही लाट जानेवारीअखेरपर्यंत राहील, असे गृहीत धरून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन बेड कमी पडू नये यासाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात 20 केएलच्या, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 10 आणि मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात 6 केएलच्या ऑक्सिजन टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे तीनशे ऑक्सिजन बेड एकाचवेळी उपलब्ध होतील.

व्यवहार्य कृती आराखडा तयार करणार

पवित्र गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आणि तिच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्लेटिंग उद्योगांच्या रासायनिक सांडपाण्याने होणारे प्रदूषण कसे रोखता येईल, यासाठी मार्ग काढला जाईल. गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, तसेच मेरी संशोधन केंद्र येथील अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे. तीन आठवड्यात या अधिकार्‍यांची समिती अहवाल सादर करणार आहे. प्रदूषण रोखणे व शुद्धीकरणाचे काम हे एका आयुक्तांच्या कार्यकाळात पूर्ण होणे शक्य नाही, माझ्या कार्यकाळात त्याची मी चांगली सुरुवात करीत व्यवहार्य कृती आराखडा तयार करील. नाशिककर नागरिक, पर्यावरण व गोदाप्रेमी यांचा या कार्यासाठी सहभाग वाढविल, असा विश्वास आयुक्त जाधव यांनी व्यक्त केला. साबरमती नदीचे शुद्धीकरण व सुशोभिकरणाची माहिती घेण्यासाठी पुढील वर्षी महापालिकेचे पथक अहमदाबादला पाठवून तेथील अभ्यास करण्यात येईल. तेथे केंद्र व राज्य सरकार, पर्यावरणप्रेमी यांच्या माध्यमातून कोणते प्रयत्न केले गेले, वेगवेगळ्या माध्यमातून अर्थसहाय्य कसे उभे केले गेले याची माहिती घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करणार

शहरात लहान-मोठे 67 नाले आहेत, त्यांचे सरळीकरण आणि खोलीकरण करून त्यालगत सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बावीस नाल्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात दोन्ही बाजूला रिटेनिंग वॉल बांधण्यात येणार आहे. जॉगींग ट्रक, वृक्ष लागवड, चौपाटी, नाना-नानी पार्क, चिल्ड्रन पार्क असे जे शक्य होईल, ते करण्यात येईल. बिल्डरांना या कामात सहभागी करून घेवून त्यांना एफएसआय देण्यात येईल, नाल्यांवर कोणत्याही बिल्डरला यापुढे अतिक्रमण करणे शक्य होणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

गावठाण विकासासाठी आराखडा

शहरातील 32 गावठाणं आहेत, तेथे अरूंद गल्ल्यांमुळे सोयीसुविधा देण्यात अडचणी येतात. या ठिकाणी मोकळी जागा मिळावी, सोयीसुविधा, पायाभूत सुविधा देता याव्यात, यासाठी गावठाण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी चार-पाचपर्यंत एफएसआय देता येईल का, याची पडताळणी केली जाईल. यासाठी आराखडा तयार करून सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात येईल. शासनाची हायपॉवर कमिटी याबाबत अंतिम निर्णय घेईल. बिल्डर आणि नाशिककर यांच्या संयुक्त सहकार्याने गावठाण विकास करणे शक्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या