फुटबॉल गल्लीगल्लीत न्यायचंय…

210

मुंबई, (क्री.प्र.)

युवासेना प्रमुख व मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने अंधेरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल साकारल्यानंतर आता त्यांच्याच प्रयत्नांमुळे परळ येथील सेंट झेवियर्स फुटबॉल मैदानालाही नवी झळाळी मिळाली आहे. आता हे मैदान हायमास्ट दिव्यांच्या फ्लडलाइट्सने झगमगू लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी नव्या प्रकाशझोत यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले, आता फुटबॉलला गल्लीगल्लीत पोहचवण्याचा ध्यास उराशी बाळगला असून मुंबईतील रेफ्री महाराष्ट्रात नावाजले जावेत यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. याचसोबत मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, फुटबॉलपटू, रेफ्री यांच्या कामाचेही आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

सेंट झेवियर्स मैदानाच्या हायमास्ट दिव्यांच्या फ्लडलाइट्स लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, नगरसेवक नाना आंबोले, प्रभाग समिती अध्यक्षा ममता चेंबूरकर, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर कांडरकर, सेक्रेटरी उदयन बॅनर्जी, उपाध्यक्ष व वडाळा विधानसभा उपविभागप्रमुख विलास राणे, सहसचिव सुधाकर राणे, सलीम अन्सारी, ए.पी. रॉड्रिक्स, मेंबर अनुप दुबे, कुलाबा विधानसभा पदाधिकारी कृष्णा पावले या मान्यवरांची उपस्थिती होती.

फोटो: संदीप पागडे
फोटो: संदीप पागडे

आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार

परळच्या सेंट झेवियर्स मैदानात आगामी काळात दोन ते तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याचा विश्‍वास मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर कांडरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

वांद्य्रातील रंगशारदा येथील मैदानाचे रूप बदलल्यानंतर पुन्हा या मैदानाकडे वळणार आहोत. या मैदानात ‘डगआऊट’वरही काम करण्यात येणार आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद व आदित्य ठाकरे यांचा मोलाचे सहकार्य आमच्यासोबत कायम असतील, असे त्यांनी पुढे आवर्जून सांगितले. दरम्यान, पुढल्या वर्षी डिव्हिजन दोन व तीन स्पर्धांच्या फायनलही येथे खेळवण्याची योजना आखली जात आहे.

महानगरपालिकेचे मोलाचे योगदान

सेंट झेवियर्सच्या मैदानाचा कायापालट झाला तो महानगरपालिकेच्या योगदानामुळेच. या मैदानाला नवे स्वरूप देण्यासाठी मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा मेंबर व युवासेनेचा कार्यकर्ता अनुप दुबे यानेही प्रचंड मेहनत घेतली. याशिवाय मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनीही आपले सर्वस्व पणाला लावत मुंबईकरांना हक्काचे मैदान मिळवून दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या