…तर अर्धी मिशी काढून सामना खेळेन, फिरकीपटू अश्विनचे पुजाराला ओपन चॅलेंज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवून आलेल्या टीम इंडियाला आता घरच्या मैदानावर इंग्लंडशी सामना करायचा आहे. 5 फेब्रुवारीपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संघही फॉर्मात असून नुकताच त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला आहे. या दौऱ्याच्याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विन याने एक चॅलेंज दिले आहे.

आर.अश्विन याने चेतेश्वर पुजाराला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी चॅलेंज दिले आहे. पुजाराने दिलेले चॅलेंज पूर्ण केले, तर आपण अर्धी दाढी-मिशी ठेवू आणि मैदानात उतरू, असे अश्विन म्हणाला आहे. अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड बोलत होता, त्यावेळी त्याने हे चॅलेंज दिले.

नक्की काय आहे चॅलेंज?

चर्चा सुरू असताना अश्विनने विक्रम राठोड यांना विचारले की ‘पुजाराला ऑफ स्पिनरच्या चेंडूवर क्रीज सोडून पुढे येऊन हवेत शॉट मारताना कधी बघणार?’ त्यावर उत्तर देताना विक्रम राठोड म्हणाले, ‘कार्य प्रगतीवर आहे. मी त्याला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी एक शॉट तरी हवेत मार, पण तो अजूनपर्यंत ऐकत नाही.’ विक्रम राठोड यांच्या या उत्तरानंतर अश्विनने पुजाराला चॅलेंज दिले. ‘जर पुजाराने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये मोईन अली किंवा अन्य फिरकीपटूला क्रीजच्या पुढे येऊन हवेत शॉट मारला, तर आपण अर्धी मिशी काढून सामना खेळण्यासाठी उतरू,’ असे अश्विन म्हणाला. यावर उत्तर देतना पुजारा हे चॅलेंज पूर्ण करेल, असे आपल्याला वाटत नसल्याचे विक्रम राठोड म्हणाले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार फलंदाजी

दरम्यान, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने मिळवलेल्या विजयात चेतेश्वर पुजाराचा वाटा मोलाचा होता. त्याने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 271 धावा काढल्या. स्टार्क, हेझलवूड, कमिन्स या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांचा त्याने धिराने सामना केला होता. तसेच नाथन लायन या फिरकी गोलंदाजालाही आसमान दाखवण्यात त्याने कसर सोडली नव्हती. आता घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतही पुजाराकडून टीम इंडियाला चांगल्या फलंदाजीची आशा आहे.

पहिल्या दोन कसोटींसाठी संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

आपली प्रतिक्रिया द्या