दररोज 10 कोटींची उलाढाल होणाऱ्या धारावीतील रोजीरोटी अबाधित राहील का? लघुउद्योजकांच्या मनात पुनर्विकासाची भीती

रहिवासी इमारतींचा पुनर्विकास करताना जागा वाढवून दिली, क्षेत्रफळ वाढवून दिले तर वाढलेल्या कुटुंबांतील कुटुंबे सामावली जातात. मात्र, धारावीत ज्यांचे आगे दुकान आणि पिछे मकान (वर मकान) असलेल्या लघुउद्योजकांचे काय, ज्यांचे 600 फुटांपासून ते 2 हजार चौरस फुटांपर्यंतचे गाळे आहेत, त्यांना त्याच्या दुप्पट जागा सरकार उपलब्ध करून देणार का, दररोज 10 कोटींची उलाढाल होणाऱया धारावीतील लघुउद्योजकांची रोजीरोटी अबाधित राहील का, या भीतीने पुनर्विकासाचा आनंद होण्याऐवजी लघुउद्योजकांना भीतीच जास्त वाटू लागली आहे.

धारावीत 5 हजार छोटे-मोठे लघुउद्योग आहेत. मात्र, यात धारावीच्या विकासात सर्वात जास्त आर्थिक सहभाग असलेले दोन लघुउद्योग आहेत ते म्हणजे चामडय़ापासून वस्तू बनवला जाणारा चर्मोद्योग आणि दुसरा म्हणजे वर्षभर सुरू असणारा मातीच्या भांडय़ाचा उद्योग. हे दोन उद्योग धारावीच्या विकासात मोलाचे योगदान देतातच, पण यांच्या बनवलेल्या वस्तू परदेशात निर्यात करून परकीय चलन मिळवून देतात. चर्मोद्योगात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाखो लोक अवलंबून असून दररोजची उलाढाल 2 कोटींहून जास्त आहे. कुंभारकामाचीही दररोजची उलाढालही लाखो-कोटय़वधीत आहे.

लेदर उद्योगाला सरकारने विश्वासात घ्यावे

चर्मोद्योगात पिढय़ान्पिढय़ा असणारी कुटुंबे आहेत. या कुटुंबांपैकी काही कुटुंबांनी आता धारावीच्या मुख्य रस्त्यांवर दुकाने उभी केली आहेत. चामडय़ाच्या विविध वस्तू विकणारी 350 दुकाने इथे आहेत. कोलकता, कानपूर आणि मद्रासमधून कच्चे चामडे इथे येते. चामडय़ांपासून प्रत्यक्ष वस्तू बनवण्याची सर्व प्रक्रिया धारावीत होते. अशा गाळय़ांची संख्या आणि क्षेत्रफळ मोठे आहे. काही गाळे हे 600 ते 2 हजार चौरस फुटांचे आहेत. सर्वांना धारावीचा पुनर्विकास हा हवाच आहे. मात्र, हा पुनर्विकास होणार कधी, दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात येते. आमचे म्हणणे फक्त इतकेच आहे की, निदान आमचे गाळे जितक्या फुटांचे आहेत तितकी जागा तरी आम्हाला मिळावी. पुनर्विकास करताना सरकारने आम्हाला विश्वासात घ्यावे, अशी मागणी धारावी लेदर गुडर्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (डिग्मा) कार्याध्यक्ष राजेश सोनावणे यांनी केली आहे.

सर्वेक्षणाआधी झोपडय़ा कशा वाढतात?

पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला की, धारावीच्या सर्वेक्षणाचा मुद्दाही गाजतो. सर्वेक्षण करणारे लघुउद्योजकांना एका गाळय़ाचे दोन गाळे करण्याचे आमिष दाखवतात. पैसे खाल्ले जातात. घर आणि दुकानांचे दोन पार्ट दाखवले जातात. विशेष म्हणजे सर्वेक्षणाआधी अनधिकृत झोपडय़ा मोठय़ा प्रमाणात वाढतात, असा आरोप करत मग सर्वेक्षण नेमके कशासाठी आणि कोणासाठी होते, असा प्रश्न धारावीकर विचारत आहेत.

कुंभार कामाला पुनर्विकासात योग्य स्थान द्या

धारावीतल्या कुंभारवाडय़ाला गेल्या दीडशे-दोनशे वर्षांची परंपरा आहे. कुंभारवाडय़ात आता हिंदू आणि मुस्लिम कुंभारांची 2 हजार लोकसंख्या आहे. कुंभारकामासाठी माती, चाके तसेच वाहतूक खर्च आता परवडत नाही. मातीच्या भांडय़ांना वर्षभर मागणी नसते. मात्र, दिव्यांना वर्षभर मागणी असते. हे दिवे मोठय़ा प्रमाणात निर्यात होतात. अशा परिस्थितीत पुन्हा धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा आला आहे. 12 एकरवर पसरलेल्या या कुंभारवाडय़ाचा विकास करताना आमचा पिढीजात व्यवसाय पुढेही कायम राहील, याकडे लक्ष द्या. राजकारणाशी आम्हाला काही लेणे देणे नाही, फक्त आम्हाला पुनर्विकासात योग्य स्थान द्या, अशी भावना पारंपरिक व्यावसायिक असलेल्या राजेश मेवडा यांनी व्यक्त केली.