यांच्याही आग लावाल का ? हिमांता सर्मा यांचा काँग्रेसला ट्विटद्वारे सवाल

assam-cm-himanta-biswa-sarma

काँग्रेसने ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) जळत्या हाफपँटचा फोटो पोस्ट केल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार करताना पक्षाने सोशल मीडियावर हे चित्र पोस्ट केले असून, भाजपकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आसामनचे मुख्यमंत्री हिमांता सर्मा यांनी ट्विटरवर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा हाफ पँटमधला फोटो शेअर केला आहे. #BharatTodoyatri हा हॅशटॅग वापरत सर्मा यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे की ‘Will you fire his also… (यांच्याही आग लावाल का ?)

खाकी पँट जळत असलेल्या प्रतिमेला कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘अजून 145 दिवस बाकी आहेत.’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी 150 दिवसांची यात्रा सुरू केली असतानाच आरएसएसवर अशी टिका करण्यात आली आहे. ही यात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूतील कन्याकुमारी ते जम्मू आणि कश्मीर हे 3,570 किमीचे अंतर 150 दिवसांच्या कालावधीत पार करेल.

भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

हे ट्विट व्हायरल होताच भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि तत्काळ फोटो काढून टाकण्याची मागणी केली. बंगळुरूचे खासदार तेजश्वी सूर्या यांनी काँग्रेसच्या या ट्विटवरून त्यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की हे चित्र काँग्रेसच्या राजकारणाचे प्रतीक आहे. ‘काँग्रेसच्या आगीने 1984 मध्ये दिल्ली जाळली. 2002 मध्ये गोध्रा येथे 59 कारसेवकांना जिवंत जाळले. त्यांनी पुन्हा हिंसाचाराची हाक दिली आहे’, असे भाजप खासदाराने लिहिले आहे.

पुढे ते म्हणातात की, ‘हे चित्र काँग्रेसच्या राजकारणाचे प्रतीक आहे – देशात पेटवलेल्या आगीचे. त्यांनी भूतकाळात लावलेल्या आगीमुळे देशातील बहुतांश भागात ते जळले (पराभूत झाले) आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमधील उरलेले राज्यही लवकरच राख होईल. हे ट्विट सेव्ह करून ठेवा.’

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘ही ‘भारत जोडो यात्रा’ नसून ‘भारत तोडो’ आणि ‘आग लगाओ यात्रा’ आहे. काँग्रेस पक्षाने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मला राहुल गांधींना विचारायचे आहे. तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का? काँग्रेसने हे ट्विट तात्काळ काढून टाकावे.’

काँग्रेसचंही प्रत्युत्तर

या चित्राबद्दल विचारले असता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एएनआयला सांगितले की, ‘मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर त्यांना (भाजप) हा मुद्दा काढायचा असेल तर ते घाबरले आहेत आणि ते काहीही बोलू शकतात’. त्यांनी ‘झूट की फॅक्टरी’चा सोशल मीडियावर ओव्हरटाइम चालू आहे’, असं म्हणत भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.