धक्कादायक माहिती, विंग कमांडर अभिनंदन यांचा ISI ने केला 40 तास छळ

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर जेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात होते तेव्हा त्यांचा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ने 40 तास छळ करण्यात आला. अभिनंदन यांना अवघ्या काही तासांमध्ये इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे नेण्यात आले. पाकिस्तानच्या लष्कराच्या ते फक्त 4 तास ताब्यात होते, यानंतर तब्बल 40 तास ते आयएसआयच्या ताब्यात होते आणि तिथे त्यांचा छळ करण्यात आला.

पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्यानंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानात जाऊन कोसळले होते. यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं होतं. सैन्याच्या ताब्यात ते फक्त 4 तास होते असं एका हिंदी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे. संरक्षण दलातील सूत्रांच्या आधारे ही बातमी दिल्याचे या बातमीमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना इस्लामाबाद इथे आणले होते. तिथून आयएसआयने त्यांना रावळपिंडी इथे नेले. अभिनंदन यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली होती त्यामुळे त्यांना कुठे जातोय, कोणाच्या ताब्यात आहोत हे काहीच कळत नव्हतं. आयएसआयच्या तपास पथकाने अभिनंदन यांना एका मजबूत कोठडीमध्ये ठेवलं होतं आणि तिथे त्यांचा 40 तास छळ करण्यात आला.

अभिनंदन यांची सुटका झाली आणि ते हिंदुस्थानात परत आले तेव्हा त्यांचा डावा डोळा काळानिळा पडल्याचं स्पष्ट दिसत होतं. आयएसआयने केलेल्या छळामुळेच त्यांच्या डोळ्याला हा मार लागल्याचं सांगण्यात येत आहे. ‘तुमचे ‘रॉ’ वालेही तुला वाचवू शकत नाही’ असं छळ करत असताना आयएसआयवाले अभिनंदन यांना सातत्याने सांगत होते.अभिनंदन यांच्या सुटकेच्या आयएसआयवाले सक्त विरोधात होते. हिंदुस्थानच्या कूटनितीमुळे पाकिस्तानवर दबाव वाढत होता, ज्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेचे आदेश दिले.