विंग कमांडर अभिनंदन यांच्या साहसाचे लोकसभेत कौतुक; पुरस्कार देण्याची मागणी

wing-commander-abhinandan-v

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या साहसाचा सोमवारी लोकसभेत गौरव करण्यात आला. त्यांचे साहस आणि त्यांनी केलेल्या धाडसी कामगिरीबाबत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या शौर्य गाजवणाऱ्या कामगिरीसाठी त्यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी चौधरी यांनी केली. त्याचप्रमाणे अभिनंदन यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशा अशी ओळख मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली. अभिनंदन यांनी गाजवलेल्या शौर्याबाबत आणि त्यांच्या साहसाबाबत देशाला गर्व आहे. अभिनंदन यांना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी शौर्य पुरस्कार देण्यात यावा. त्यांच्या मिशांचे सोशल मिडीयावरही कौतुक झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशा अशी ओळख मिळावी असेही ते म्हणाले.

हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हवाई दलाने पिटाळून लावले. त्यावेळी पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ 16 चा पाठलाग करून ते पाडण्याची कामगिरी अभिनंदन यांनी केली. मात्र, ते पाकिस्तानच्या लष्कराकडून पकडले गेले. पाकिस्तानच्या ताब्यात ते तीन दिवस होते. या काळात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती पाकिस्तानला दिली नाही. ते परतल्यानंतर वाघा सीमेवर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या या साहसाचा आणि शौर्याचा उल्लेख करत त्यांना पुरस्कार देण्याची मागणी चौधरी यांनी केली.