कुल कुल थंडीत खा, ‘हे’ गरमागरम पदार्थ

सामना ऑनलाईन । मुंबई

नोव्हेंबर महिना सुरु झालाय. आताशा कुठे थंडीची चाहूल लागलीय. थंडीत भुक वाढतेच. यामुळे या दिवसात अनेकजण समोर दिसेल ते खात सुटतात. यामुळे हिवाळ्यात अनेकजणांच अचानक वजन वाढू लागत. म्हणूनच या दिवसात भूक लागल्यावर अरबट-चरबट पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी पौष्टीक व रूचकर पदार्थ खावे.

१) दुधाची साय- रवा उत्तपा

recipe1

साहित्य
एक वाटी बारीक रवा, एक वाटी दुधाची साय, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, फ्लावर, कोबी(आवडत्या भाज्या)एकत्रित साधारण एक वाटी, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तेल, चवीनुसार मीठ, पाणी

कृती
सर्वप्रथम रवा, साय, मीठ, व पाणी घालून डोसाप्रमाणे बॅटर बनवून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. त्यानंतर त्यात सर्व भाज्या घालून नीट एकत्रित करून घ्या. डोसाच्या तव्यावर नेहमीप्रमाणे उत्तपे घाला. सर्व बाजूने तेल सोडून परतवा. त्यानंतर गरमागरम उत्तपे चटणीसोबत खायला द्या.

२) बाजरी मटार मुटकुळे

recipe2

साहित्य
एक वाटी बाजरीचे पीठ, एक वाटी मटार दाणे, अर्धी वाटी बेसन, १-२ चमचे आले लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, लाल तिखट, धने पावडर, १ चमचा भाजलेले तीळ, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, फोडणीचे साहित्य

कृती
सर्वप्रथम मटार थोडेसे वाफवून घ्या, त्यात तेल व फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य एकजीव करून थोडेसे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या. अलगद हाताने त्याचे मुटकुळे बनवा. मुटकुळे तळून किंवा वाफवून घ्या. गरमागरम मुटकुळे सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या.

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खाल तर आरोग्य संपन्न व्हाल !

३) बटाटा पोहे कटलेट

recipe3

साहित्य
अर्धा किलो बटाटे, पाव किलो जाड पोहे, आले-लसूण पेस्ट, ४-५ ब्रेड स्लाईस, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल

कृती
सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करून घ्या. मिक्सरला ब्रेडचा बारीक चुरा करून घ्या. पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवा. आता बटाटे, ब्रेडचा चुरा, पोहे, यात मीठ व आले लसूण पेस्ट घालून नीट एकजीव करा. त्याचे गोळे करून तेलात मंद आचेवर तळून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या