आरोग्य- थंड वातावरणाचा हृदयावर होणारा परिणाम

डॉ. प्रवीण कुलकर्णी  

केवळ वयोवृद्धांमध्येच नाही, तर तरुणांमध्येही हृदयविकाराच्या तक्रारी दिसून येत आहेत. उच्च रक्तदाब, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांसारख्या घटकांव्यतिरिक्त ऋतुमानातील बदलदेखील हृदयावर दुष्परिणाम करण्याची शक्यता असते. हिवाळय़ात जेव्हा बाहेरच्या वातावरणात थंडावा निर्माण होतो, अशा वातावरणात हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव जास्त असतो.

हिवाळय़ात हृदयाची काळजी घेणे आणि निरोगी जीवन जगणे अतिशय गरजेचे आहे. हिवाळय़ात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. हिवाळय़ात थंड हवामान तुम्हाला श्वसनाच्या समस्या किंवा सांधेदुखीच नाही तर हृदयविकाराचाही धोका निर्माण करते. जे धूम्रपान करतात, बैठी जीवनशैली जगतात आणि उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या असलेल्या व्यक्तींना हिवाळय़ात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

थंड हवामानाचा तुमच्या हृदयावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या

विविध अभ्यासानुसार, अचानक हवामान बदलामुळे, तापमान अनपेक्षितपणे घटल्यानेही हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हार्ट फेल्युअर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या अशा हृदयविकार वाढण्याची शक्यता असते.

थंड हवामानामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवता येत नाही आणि अशा स्थितीमध्ये हायपोथर्मिया होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना वाढते.

आधीपासून हृदयविकार असलेल्यांनीदेखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

हिवाळा सुरू झाला की, बाहेरच्या थंड वातावरणामुळे व्यायाम करता येत नाही आणि हे हृदयासाठी घातक ठरू शकते. याशिवाय हिवाळय़ात तेलकट, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. याचा परिणाम हृदयावर होऊन हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्यासाठी हे काही अप्रत्यक्ष घटक जबाबदार आहेत. वायुप्रदूषण हा आणखी एक चिंताजनक घटक असून यामुळे हृदयाला धोका पोहोचण्याची शक्यता असते.

छातीत दुखणे, मळमळ, उलटय़ा होणे, चक्कर येणे आणि थकवा येणे ही हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

हिवाळय़ात हृदयविकाराच्या झटक्यापासून प्रतिबंधासाठी

गरम कपडे- हवामानासाठी अनुकूल असे कपडे परिधान करा. असे केल्याने तुम्हाला उबदार राहण्यास आणि हिवाळय़ात तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. टोपी, हातमोजे आणि स्वेटर घालावे.

दररोज व्यायाम-रोजच्या शारीरिक हालचालींमुळे प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच व्यायाम करा, पण थंड वातावरणात व्यायाम टाळा. शिवाय घरामध्येच राहणे आणि तीव्र थंडी टाळणे चांगले.

रक्तदाब तपासणी – रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

संतुलित आहार- आहारामध्ये ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगा, संपूर्ण धान्य, बेरी, शेंगा, फ्लॅक्ससीड्स, पालक, गाजर आणि ब्रोकोली यांचा समावेश करावा. जंक, मसालेदार, तेलकट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ टाळा.

नियमित हृदय तपासणी – डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दर सहा महिन्यांनी हृदय तपासणी करावी.

कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR)- हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सीपीआर पद्धतीबाबत समजून घेतल्यास फायदेशीर ठरेल.

 (लेखक ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई येथे हृदयरोगतज्ञ आहेत)