हिवाळी अधिवेशन मुंबईतच, नागपूरमध्ये होण्याची शक्यता धुसर

1121

नागपूर करारानुसार वर्षातील एक अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची परंपरा आहे. पण सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने आणि सरकार स्थापन न झाल्याने अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची कोणतीच तयारी झालेली नाही. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तीन दिवसांचे अधिवेशन मुंबईत पार पडेल. मात्र त्यानंतर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घ्यायचे झाल्यास तयारीसाठी वेळ कमी मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे यांदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच पार पडणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

परंपरेनुसार नागपूरला अधिवेशन घ्यायचे झाल्यास तयारीसाठी कमी केळ मिळणार आहे. दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हिवाळी अधिवेशन होते. यासाठी सुमारे महिनाभर आधी तयारी सुरू होते. अधिवेशनाच्या एक आठवडा आधी मुंबईहून संपूर्ण मंत्रालय कर्मचारी आणि सरकारी अधिकारी नागपुरात पोहोचतात. मुंबईतून नागपूरला मंत्रालयातून विविध विभागांच्या फायली ट्रक भरून नागपूरला पोहोचतात. अशा वेळी उपराजधानी नागपूर म्हणजे मिनी मंत्रालयच होते. परंतु यंदा नागपूरला अधिवेशन होणार किंवा नाही याबाबत मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग अनभिज्ञ आहेत. मात्र महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

55 वर्षांनंतर 2018 मध्ये राज्याच्या तत्कालीन फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेतले होते. त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात नागपूरमध्ये घेतले होते. 1963 नंतर पहिल्यांदाच मुंबईत घेतले गेले होते. 1963 मध्ये 9 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत मुंबईत हिवाळी अधिवेशन झाले होते. त्यामुळे आता येणारे नवीन सरकार यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर किंवा मुंबईत घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या