आपण हिंदू राष्ट्र आहोतच; कमलनाथ यांचं मोठं विधान

काँग्रेसचे खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ मंगळवारी म्हणाले की, देशातील 82 टक्के लोक हिंदू असल्याने हिंदुस्थान हे आधीच हिंदू राष्ट्र आहे. स्वयंघोषित गुरू धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्राच्या मागणीचा संदर्भ देताना त्यांनी हे विधान केले. या प्रकरणावरून कोणताही वाद सुरू करू नये, कारण आकडेवारी तरी सध्या हेच सिद्ध करत असल्याचं ते म्हणाले.

‘आपल्या देशात 82 टक्के हिंदू असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. आम्ही हिंदू राष्ट्र आहोतच त्यात वादच नाही’, असं ते म्हणाले.

छिंदवाडा येथे बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्री यांचे स्वागत केल्यानंतर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेत्याने कमलनाथ यांचे पुत्र खासदार नकुल कमलनाथ यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. त्याच्या एक दिवसानंतर काँग्रेस नेत्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवानंद तिवारी यांनी काँग्रेस खासदार नकुल कमलनाथ यांच्यावर छिंदवाडा येथे धीरेंद्र शास्त्रींचे आयोजन केल्याबद्दल टीका केली आणि आरोप केला की बागेश्वर धामच्या प्रमुखांनी उघडपणे देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा केली आहे.

‘आम्ही शास्त्रींना त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी विरोध करत आलो आहोत. आमचा देश राज्यघटनेने चालतो, इतर कोणत्याही विचारसरणीवर नाही’, असं तिवारी म्हणाले.

‘राजकीय लाभांश मिळविण्यासाठी आपण आणखी किती खाली जाणार?’, असा सवाल आरजेडी नेत्यानं केला.

नकुल कमलनाथ यांनी धीरेंद्र शास्त्रींचं स्वागत केलं होते. ‘छिंदवाड्याच्या पवित्र भूमीला गुरुदेवांच्या चरणांचा स्पर्श झाला हे आमचे भाग्य आहे’, असं काँग्रेस खासदार म्हणाले होते.