भगवद्गीताच का, कुराण-बायबलही मोफत वाटा!

सामना ऑनलाईन । मुंबई 

महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता वितरित करण्याच्या मुद्दय़ावरून मध्यंतरी निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केला. शिक्षण संस्थांमध्ये भगवद्गीता वाटणे म्हणजे धर्मांधता नसून कुराण आणि बायबलही विनामूल्य वाटले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

गिरगावातील भक्तिवेदांत विद्यापीठ संशोधन केंद्राचे लोकार्पण शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. “शिक्षण संस्थांमध्ये गीता वाटण्याचा विचारही सध्या केला तर भाजपा शिक्षणाचे भगवाकरण करतेय असा आरोप प्रसारमाध्यमे करतील” असे तावडे यावेळी म्हणाले. भक्तिवेदांत ट्रस्टने ठाणे जिह्यातील महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता वाटण्याचा मानस व्यक्त केला होता त्यावेळी आपण सरकार असे करू शकत नाही पण भगवद्गीतेच्या प्रती कोणत्या महाविद्यालयांमध्ये दिल्या जाऊ शकतात त्याची यादी देऊ शकतो असे ट्रस्टला सांगितले होते असे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षण अधिकार्‍यांना त्यासाठी मदत करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या पण ट्रस्टच्या लोकांनी स्वतः महाविद्यालयांमध्ये जाऊन भगवद्गीता वाटल्या असे ते म्हणाले.