पोलिसांनी 10 दिवस माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, मध्य प्रदेशातील महिलेचा आरोप

प्रातिनिधीक फोटो

मध्य प्रदेशात एका महिलेने पोलिसांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचं तिचं म्हणणं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या 20 वर्षीय महिलेवर हत्येचा आरोप असून ती कारागृहात कैद आहे. 10 ऑक्टोबर रोजी कारागृह आयुक्त आणि काही वकिलांचं पथक कारागृहाची पाहणी करण्यासाठी दाखल झालं होतं. तेव्हा या महिलेने बलात्कार झाल्याचं त्यांना सांगितलं. तिच्या म्हणण्यानुसार, 9 ते 21 मे 2020 या दिवसांत पोलीस कोठडीतच सामूहिक बलात्कार करण्यात आला. यात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, एक चौकीचा प्रमुख आणि तीन हवालदारांचा समावेश आहे.

या प्रकाराला तेथील महिला कॉन्स्टेबलने विरोधही केला होता. मात्र, त्यांनी तिला दरडावून शांत राहण्यास सांगितलं, असं तिचं म्हणणं आहे. तसंच या प्रकरणाविषयी तीन महिन्यांपूर्वीच जेलच्या वॉर्डनला सांगितल्याची माहिती महिलेने पथकाला दिली. त्यानंतर जेलच्या वॉर्डनला याबाबत विचारणा केल्यानंतर वॉर्डननेही महिलेने दिलेल्या माहितीबाबत पुष्टी केली.

त्यामुळे या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच रीवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांना त्वरित कारवाई करण्याबाबत सांगितलं आहे. महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या